Karma That Will Change Your Life - Power of Positivity | मनुष्याचे कर्म इच्छेनुसारच!
मनुष्याचे कर्म इच्छेनुसारच!

जिकडे तिकडे संसाराचा बाजार भरला आहे. या बाजारात सारी खटपट क्रियमाण-कर्म करण्याची वाढलेली दिसते. या बाजाराला जाण्याकरिता मनाची अवस्था महत्त्वाची असते. बाजार कसा आहे, याची प्रचिती कर्माच्या वाटेने गेल्यास येते. कर्म चांगले की वाईट हे त्याच्या मनावरून ठरते. मनानुसार पाप-पुण्याचा निवाडा होतो. मनानेच या बाजाराची देखरेख केली जाते. मनानुसार संकल्प-विकल्प निर्माण होतात. या सर्व कार्याचे साक्षीदार मन आहे. या संसारात प्रत्येक मनुष्य आपल्या इच्छेनुसार कर्म करतो. म्हणजे मनानुसार त्या मनानेच देव आळविला जातो. त्या मनानेच पाप-पुण्य घडतात. त्या मनानेच कर्माची बंधने तुटतात किंवा जुळतात. शरीर स्त्रीचे असो या पुरुषाचे कालांतराने नष्ट होणार; हे खरे असतानादेखील मन त्याला उपाधीत अडकविते. मृगजळाप्रमाणे त्याला भासविते. त्या मनस्वी स्थानावरून जगातील सर्व पदार्थ जाणता येतात. सर्व प्रकारच्या भयापासून तेच मन मुक्त होते किंवा तेच मन भय निर्माण करते. मनानेच काम-क्रोधाला पुष्टी मिळते. मनाची तृप्ती होईपर्यंत मन संसाररूपी भवसागरात डुबक्या मारते. जगातील सर्व कल्पनांचे साक्षी मन आहे.

आपल्याविषयी असलेले प्रेम मोठ्या आदराने निखळून पाहणे किंवा शुद्ध प्रेम असल्याची खात्री पटणे हेही मनावरच ठरते. ब्रह्मज्ञानाचा अनुभव किंवा भक्तिसुखाचा अनुभव मनच घेत असते. आपल्या व्यापक स्वरुपाची कल्पना मनच करते. तुझे-माझे, द्वैत-अद्वैत याचा निर्णय मनच घेत असते. अर्जुनाच्या मनातला संशय घालविण्यासाठी देवाने विश्वरुप दाखविले. तेव्हा अर्जुनाच्या मनातील संशय दूर झाला. फक्त मनात संशय आला की किती गोंधळ उडतो. सर्वच दृष्टिकोन बदलतो. जोपर्यंत मनातला संशय जात नाही तोपर्यंत मनाचे समाधान होत नाही. मन नेदी समाधान- मनाचे समाधान महत्त्वाचे असते. या सर्व गोष्टीला कारणीभूत ‘मन’ आहे. निरुपाधिक किंवा उपाधीरहित अवस्था ही मनावर अवलंबून असते. मनाचा व्यापकपणा, संकुचितपणा त्या मनुष्याच्या कृतीनुसार ठरतो. ती कृती ‘मनच’ करते. संसार जिंंकायचा की त्यात बुडायचे याचे चिंतन मनानीच होते. मन ठरवेल त्यानुसार मनुष्याची ओळख होते. मनरुपी गंगेचा अभिषेक शुद्धरुपी विचारांनी करा. मन मंगलकारक व शुद्ध मोत्यासारखे बनवा. मनुष्यदेहाची सहजता कळेल.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: Karma That Will Change Your Life - Power of Positivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.