अज्ञानाच्या आवरणामुळे देवजवळ असूनही कळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:49 PM2019-10-05T18:49:04+5:302019-10-05T18:53:00+5:30

देव तर ह्रदयातच आहे

Ignorance does not make sense even if it is with God | अज्ञानाच्या आवरणामुळे देवजवळ असूनही कळत नाही

अज्ञानाच्या आवरणामुळे देवजवळ असूनही कळत नाही

Next

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

देव आहे का..?
स्वामी विवेकानंदांनी एकदा परमहंसांना विचारले, गुरूदेव..! देव या जगात आहे का.? असलाच तर तो कुठे असेल..? रामकृष्णांनी उत्तर दिले - आपल्या जवळ... अगदी अंतर्यामि.. संत म्हणतात,
देव जवळी अंतरी ! भेटी नाही जन्मभर !!
मग गुरु देव तो जर इतका जवळ असेल तर दिसत का नाही..? भेटत का नाही..? रामकृष्ण म्हणाले,
आगपेटीतल्या प्रत्येक काडीत अग्नी असतो पण नरेंद्रा, तो दिसतो का रे..? फुलातल्या प्रत्येक कळीत सुगंध दडलेला असतो पण तो दिसतो का..? प्रत्येक बीजात वृक्ष असतो पण तो दिसतो का..? त्या वस्तूमधील त्याचे अस्तित्व दिसण्याकरिता काही क्रिया आधी घडून जाव्या लागतात. बीजातला वृक्ष दिसण्याकरिता बीजाला भूमी भेटावी लागते, पाणी मिळावे लागते, म्हणजेच वृक्ष दिसतो. प्रत्येकाच्या अंतरंगात देव आहे पण तो दिसावा असे वाटत असेल तर, एकनाथ महाराज म्हणतात - हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय..!
या वचनांतून संत एकनाथ महाराज देव प्राप्तीचे वर्म सांगतात. संताकडे गेल्याशिवाय व त्यांची सेवा केल्याशिवाय देवाची ओळख होणार नाही. देव तर ह्रदयातच आहे. गीता माऊली म्हणते - सर्वस्य चाहं ह्रदीसंन्निविष्टो:..!
माऊली म्हणतात,
तैसा ह्रदयामध्ये मी रामु, असता सर्व सुखाचा आरामु,
का भ्रांतासी कामु, विषयावरी..!

संत सांगतात - प्रत्येकाच्या ह्रदयामध्ये असलेला परमात्मा सामान्य जीवांना विषयांच्या भ्रांतीमुळे दिसत नाही. अज्ञानाच्या आवरणामुळे तो जवळ असूनही कळत नाही. ज्याप्रमाणे पाण्याने भरलेली विहीर आहे, आत पाणीही भरपूर आहे पण त्या पाण्यावर शेवाळ्याचे आवरण आलेले आहे त्यामुळे विहीरीत पाणी असून देखील दिसत नाही. पाणी प्यावयाचे असेल तर हाताने शेवाळे दूर करण्याची गरज आहे. अगदी तसेच देव दिसावा असे वाटत असेल तर, अज्ञानरु पी आवरण दूर करण्याची गरज आहे. संत जीवाच्या ठिकाणी असणारे अज्ञानरु पी आवरण दूर करण्याचे काम करतात. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात,
हरि प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्र. 83298 78467 )

Web Title: Ignorance does not make sense even if it is with God

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.