स्वयं दास्य तपस्वीनाम्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 04:30 AM2019-12-31T04:30:33+5:302019-12-31T04:31:12+5:30

जो करतो तो तपस्वी असतो. तपस्वी हा शब्द गुणवाचक आहे. कुणीही तपस्वी होऊ शकतो. तिथं जातीपातीचं बंधन नाही. तप हे कष्टसाध्य आहे.

do your own work be independent | स्वयं दास्य तपस्वीनाम्

स्वयं दास्य तपस्वीनाम्

Next

- बा. भो. शास्त्री

एका बाईने स्वत:ची वाटी दुसऱ्या बाईला धुण्यासाठी दिली. ते श्रीचक्रधरांना रुचलं नाही. तेव्हा या सूत्राचा त्यांनी पुनरोच्चार केला व आपलं काम आपणच करण्याचा सल्ला दिला. जो करतो तो तपस्वी असतो. तपस्वी हा शब्द गुणवाचक आहे. कुणीही तपस्वी होऊ शकतो. तिथं जातीपातीचं बंधन नाही. तप हे कष्टसाध्य आहे. तप व तपश्चर्या हे शब्द अलीकडे कालबाह्य झाल्यासारखे वाटतात. चंगळवादात त्या शब्दांना स्थान नाही. याला कारण तसे आदर्श तपस्वी दिसत नसतील किंवा मनात भरत नाही. काहींच्या प्रमादामुळे विश्वासच राहिला नसेल, असंही असू शकतं. पण त्यात त्या शब्दांचा दोष नाही. अंधाºया खोलीत सूर्यप्रकाश पोहोचत नसेल तर सूर्याचा दोष नाही. बहिºयाला संगीत ऐकू येत नाही, म्हणून त्याचं मूल्य कमी होत नाही. तप म्हणजे काय? स्वत:ला तापवून घेणे. विटेचा भेंडा कच्चा असतो, गरम भट्टीत भाजला की पक्का होतो. भाकर भाजावी लागते. डाळ शिजावी लागते. अग्नी हा निर्दोष आहे. तो दोषांना जाळतो. कच्चेपण जाळून पक्कं करतो. रामायणात रामाने सीतेची अग्निपरीक्षा घेतल्याचा उल्लेख आहे. आजही आपण सोन्याची परीक्षा आगीत टाकूनच घेत असतो. तप्त होताच ते उजळतं, तेजाळतं.
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात,
आगमापाययिनोनित्या
स्तांस्तितिक्षस्व भारत
सुखाचा अव्हेर व दु:ख सहन करण्याचा सल्ला भगवंत देतात. अर्जुन संतापरहित होऊन लढतो. म्हणून देव त्याला परंतप हे विशेषण लावतात. हीच तपश्चर्या आहे, ती घरात जनकाने, रस्त्यावर गाडगेबाबांनी केली. तप संतापाला सहन करतो तोच तपस्वी असतो. यश मिळवणारा यशस्वी, तर जो तप साधतो तो तपस्वी आहे. सूर्य तपतो म्हणून तेज आहे, चमक आहे ती कुणाला नको? सगळ्यांनाच हवी, पण स्वत:ची असावी.

Web Title: do your own work be independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.