एसटीचे तीन प्रदेश महिनाभरात २९ कोटी रुपयांनी आले तोट्यात

By विलास गावंडे | Published: January 21, 2024 04:27 PM2024-01-21T16:27:46+5:302024-01-21T16:28:00+5:30

मुंबई, पुणे, नाशिक माघारले : उत्पन्न कमी, खर्च वाढतीवरच

The three regions of ST incurred a loss of Rs. 29 crores in a month | एसटीचे तीन प्रदेश महिनाभरात २९ कोटी रुपयांनी आले तोट्यात

एसटीचे तीन प्रदेश महिनाभरात २९ कोटी रुपयांनी आले तोट्यात

विलास गावंडे
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक या तीन प्रदेशाचा तोटा वाढला आहे. शासनाकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलतीनंतरही हे प्रदेश उत्पन्नाच्या बाबतीत माघारले असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २३ मध्ये महामंडळाने उत्पन्न व खर्चाच्या बाबतीत केलेल्या हिशेबातून याबाबी पुढे आल्या आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती मुंबई, पुणे, नाशिक प्रदेशाची राहिली आहे.

डिसेंबर महिन्यात महामंडळाचा सर्व विभाग मिळून एकूण तोटा सात कोटी इतका आहे. या तोट्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक विभागामुळे भर पडली आहे. हा खर्च आटोक्यात आणण्यासाठी महामंडळाने उपाययोजना सूचविल्या आहेत. मुंबई प्रदेशात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे हे एसटीचे विभाग येतात. या प्रदेशाचा डिसेंबर महिन्यातील तोटा १४ कोटी २४ लाख इतका राहिला आहे. पुणे प्रदेश ११ कोटी ९१ लाखांनी तोट्यात आहे. या प्रदेशात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या विभागाचा अंतर्भाव आहे. नाशिक प्रदेश दोन कोटी ७२ लाखांनी तोट्यात गेला आहे. या विभागामध्ये अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक हे विभाग येतात.

महामंडळाच्या तीन प्रदेशांनी उत्पन्नाच्या बाबतीत आघाडी घेतली असली तरी तोट्यात असलेल्या प्रदेशामुळे एसटीचा डिसेंबर २०२३ मधील एकूण तोटा सात कोटी इतका दर्शविण्यात आला आहे. तोट्यातील प्रदेश नफ्यात आणण्याची जबाबदारी नियंत्रण समित्यांवर सोपविण्यात आलेली आहे. त्यांनी विभाग नियंत्रकांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा महामंडळाला आहे.

अतिकालिक भत्ता अवाजवी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना अवाजवी अतिकालिक भत्ता दिला जात असल्याचीही बाब पुढे आली आहे. जादा ड्युटी झाल्यानंतर याचा लाभ दिला जातो. वास्तविक कमी वेतन श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना हा लाभ देणे महामंडळाला अपेक्षित आहे. परंतु, जादा वेतनश्रेणीचे कर्मचारी अशा कामगिरीवर पाठविले जात असल्याचे मत महामंडळाने नोंदविले आहे. या भत्त्यावर नियंत्रण आणल्यास खर्चावरही बचत होईल, असे नमूद करण्यात आले आहे. शिवाय विनासवलतमध्ये वाढ, केपीटीएलमध्ये वाढ यासह इतर काही उपाय सुचविण्यात आलेल्या आहेत.

तीन प्रदेशाची चांगली कामगिरी
उत्पन्नाच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती प्रदेशाची कामगिरी चांगली राहिली आहे. छत्रपती संभाजीनगर प्रदेशाने १२ कोटी ९३ लाख, नागपूरने सहा कोटी ३२ लाख, तर अमरावती प्रदेशाने दोन कोटी ६२ लाख इतका नफा मिळवून दिला आहे.

Web Title: The three regions of ST incurred a loss of Rs. 29 crores in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.