नव्या वर्षात विकासकामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 09:58 PM2018-01-05T21:58:41+5:302018-01-05T21:58:52+5:30
शेततळे, हागणदारीमुक्ती, धडक सिंचन विहिरी, भूसंपादन, रेशीम लागवड अशा विविध कामांमध्ये २०१७ मध्ये जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे. तर नव्या वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्यासोबतच सर्वच विकासकामे गतिमान पद्धतीने व नियोजनपूर्वक पूर्ण केली जातील, असा संकल्प जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेततळे, हागणदारीमुक्ती, धडक सिंचन विहिरी, भूसंपादन, रेशीम लागवड अशा विविध कामांमध्ये २०१७ मध्ये जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे. तर नव्या वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्यासोबतच सर्वच विकासकामे गतिमान पद्धतीने व नियोजनपूर्वक पूर्ण केली जातील, असा संकल्प जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
नववर्षानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, १० नोव्हेंबरपासून महसूल विभागात सुरू केलेल्या ‘झिरो पेन्डेन्सी’ अभियानाला यश येत आहे. पहिल्या टप्प्यात अभिलेख्यांचे अद्ययावतीकरण केले जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यात डेली डिस्पोझल करण्यावर भर राहील. नियमानुसार ५ वर्षापर्यंतच जतन करावे लागणारे अभिलेखे आपण गेल्या ३०-४० वर्षांपासून ठेवले आहे. त्याची गरज नाही. प्रलंबित प्रकरणे योग्यरित्या मार्गी लावण्यासाठी सिक्स बंडल सिस्टीम राबविणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचे लक्ष्य मिळाले आहे. गेल्या दोन वर्षात त्यातील १६४९ पूर्ण झाले होते. मी रुजू झाल्यानंतर तीन महिन्यात १०३७ कामे सुरू केली. ८८२ कामे पूर्ण झाली, तर १५५ कामे प्रगतीपथावर आहेत. यवतमाळला राज्यातील सर्वाधिक शेततळ्यांचा जिल्हा करण्याचा मानसही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला. तुती लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकºयांची नोंदणी केली जात आहे. एक हजार शेतकºयांचे लक्ष्य पूर्ण करून वाढीव उद्दिष्ट मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ७२.८ टक्के लोकांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. ६३ हजार ६८९ शौचालयाची कामे पूर्ण झाली आहेत. बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, कळंब हे तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. आता हे काम मिशनमोडवर घेऊन संपूर्ण जिल्हा हाणदारीमुक्त घोषित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रधानमंत्री आवास योजनेतील ६३.६८ टक्के लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. उर्वरित नोंदणी येत्या १५ दिवसात पूर्ण केली जाईल. धडक सिंचन विहिरींचे जिल्ह्याला ४८०० इतके उद्दिष्ट असून त्यात आतापर्यंत ३२६६ लाभार्थ्यांची निवड झाली आहे. तर मे महिन्यापर्यंत संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले की, कोरेगाव भीमा प्रकरणात जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच कळंब रोड व धामणगाव रोडवर दोन एसटी बसेसची ताडफोड झाली. या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रेल्वेसाठी फेब्रुवारीपर्यंत भूसंपादन पूर्ण होईल
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम गतिमान पद्धतीने पूर्ण केले जात आहे. एकंदर १८४ किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून जात आहे. त्यासाठी ९५ गावांतील जमिनीचे संपादन आवश्यक आहे. भूसंपादनाची बहुतांश प्रकरणे आटोपली आहेत. तर येत्या फेब्रुवारीअखेरीस जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण केले जाईल. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ करिताही जिल्ह्यातील ५९ गावांतील जमिनीचे अधिग्रहण केले जात आहे. हे काम जानेवारीच्याच अखेरीस पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले.
यवतमाळच्या पाणीटंचाईवर ‘फोकस’
यवतमाळात यंदा तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यासाठी अमृत योजनेच्या कामासाठी बेंबळावर दोन मोठ्या पंपिंग मशिन बसविण्यास राज्य समितीने मान्यता दिली आहे. येत्या ३-४ दिवसात त्याची वर्क आॅर्डरही निघणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मशिन कार्यान्वित होण्यासाठी दोन महिने लागतील. चापडोह प्रकल्पावर प्रत्यक्ष पाहणी केली असता, शहराला महिनाभर पुरेल एवढे पाणी तेथे आहे. परंतु, उन्हाळ्यातील टंचाई डोळ्यापुढे ठेवून टँकर पुरवठा, विहिरींचे अधिग्रहण या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्याबाबत रोज आढावा घेतला जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.