नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षाचा खून, दगडाने ठेचून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 17:59 IST2018-10-14T17:58:46+5:302018-10-14T17:59:40+5:30
शहरात तणाव : आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न, कुटुंबियांना हलविले

नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षाचा खून, दगडाने ठेचून केली हत्या
यवतमाळ - दारव्हा शहरातील बारीपुरा परिसरात पूर्ववैमनस्यातून नगरपरिषदेच्या उपाध्यक्षाचा डोक्यात दगड घालून रविवारी सकाळी 10 वाजता खून करण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली. संतप्त जमावाने याच परिसरातील आरोपीचे घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कुटुंबियांना पोलिसांनी प्रसंगावधान राखत सुखरुप बाहेर काढले.
शहराच्या राजकारणात व भाजीमंडीमध्ये प्रस्थ असलेल्या सुभाष दुधे (48) यांचा घराजवळच खून करण्यात आला. आरोपी संदीप तोटे (30) याने डोक्यात दगड घालून जुन्या वादाचा वचपा काढला. ही घटना माहीत होताच बारीपुरा परिसरातून मोठा जमाव निघाला. जमावाने आरोपीचे घर जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या घरातील वस्तूंची तोडफोड केली. यावेळी तोटे कुटुंबिय घरातच होते. घटनेची माहिती मिळताच दारव्हा ठाणेदार रिता उईके व एसडीपीओ नीलेश पांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जमावाच्या तावडीतून कसेबसे तोटे कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर संपूर्ण शहरातच तणाव निर्माण झाला. भाजी मार्केटसह मुख्य बाजारपेठही बंद होती. पोलिसांनी लगतच्या दिग्रस, लाडखेड, नेर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण केले. इतकेच नव्हे तर बारीपुरा परिसरात एसआरपींची तुकडीही तैनात करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दारव्हा ठाण्यात सुरू होती. मुख्य आरोपी पसार असून पोलीस शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.