एमआयडीसी ते दर्डानगर पाईपलाईन भंगारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:12 PM2018-03-15T23:12:42+5:302018-03-15T23:12:42+5:30
भीषण पाणीटंचाईने गोखी प्रकल्पाच्या पाण्याचा पर्याय पुढे आला असला तरी दशकापूर्वी या प्रकल्पाचे पाणी शहराच्या काही भागात नियमित वितरित होत होते. त्यासाठी एमआयडीसी ते दर्डानगर टाकीपर्यंत पाईपलाईनही होती.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : भीषण पाणीटंचाईने गोखी प्रकल्पाच्या पाण्याचा पर्याय पुढे आला असला तरी दशकापूर्वी या प्रकल्पाचे पाणी शहराच्या काही भागात नियमित वितरित होत होते. त्यासाठी एमआयडीसी ते दर्डानगर टाकीपर्यंत पाईपलाईनही होती. मात्र देखभाल-दुरुस्ती अभावी कमकुवत झालेली पाईपलाईन २००८ साली चक्क भंगारात काढण्याचा अफलातून प्रकार पुढे आला. या पाईपलाईनची त्याचवेळी योग्य निगा राखली असती तर आज सुमारे दीड लाख नागरिकांची तहान हा प्रकल्प भागवू शकला असता.
तत्कालीन उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या दूरदृष्टीने १९८०-८१ मध्ये यवतमाळात एमआयडीसी मंजूर झाली. मात्र एमआयडीसीला पाणी पुरवठ्याचा प्रश्न होता. त्याच वेळी दारव्हा तालुक्यात गोखी प्रकल्प निर्माणाधीन होता. बाबूजींनी या प्रकल्पाचे पाणी एमआयडीसीला आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. योग्य नियोजन करून पाईपलाईनद्वारे पाणी एमआयडीसीपर्यंत आणले. प्रकल्प ते एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या पाईपलाईनचा खर्च एमआयडीसीने केला होता. जुनी एमआयडीसी व विस्तारीत एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर १९८५ मध्ये शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते. तर बाबूजी यवतमाळचे पालकमंत्री आणि पाटबंधारे मंत्री होते. यवतमाळ शहरालगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्यांनी दर्डानगर परिसरात टाकीचे नियोजन केले. महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून एमआयडीसी ते दर्डानगरपर्यंत पाईपलाईन टाकण्यात आली. दर्डानगर परिसर, लोहारा परिसर व लगतच्या १५ सोसायट्यांना पाणी उपलब्ध करून दिले. यवतमाळ शहरालगतच्या पूर्वीच्या ग्रामीण वसाहतीला पाणीपुरवठा व्हावा हा त्या मागील मुख्य उद्देश होता.
१९७१ साली यवतमाळात निळोणा प्रकल्प कार्यान्वित झाला. ४० हजार लोकसंख्येच्या यवतमाळला पाणीपुरवठ्यासोबतच एक लाख लोकसंख्येचे नियोजन करण्यात आले होते. मात्र शहरालगतच्या ग्रामीण भागाला येथून पाणीपुरवठा होत नव्हता. बाबूजींनी विशेष प्रयत्न करून दर्डानगर येथे पाण्याची टाकी उभारली आणि एमआयडीसीपासून पाईपलाईन टाकून ग्रामीण भागासाठी पाणी उपलब्ध करून दिले. चापडोह प्रकल्प पूर्णत्वास येईपर्यंत या प्रकल्पाचे पाणी दर्डानगर टाकीतून शहराच्या ग्रामीण भागात वितरित होत होते. मात्र चापडोह प्रकल्प पूर्णत्वास आला आणि दर्डानगर टाकी चापडोह प्रकल्पाला जोडली गेली. परिणामी एमआयडीसी ते दर्डानगरपर्यंतच्या पाईपलाईनकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. ही पाईपलाईन ज्या भागातून आली त्या भागात नवनवीन वसाहती निर्माण झाल्या. अनेक ठिकाणी ही पाईपलाईन फुटली. जीवन प्राधिकरणाने २००८ साली ही पाईपलाईनच भंगारात काढली.
तत्कालीन पालकमंत्री जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांनी दूरदृष्टीने ही पाईपलाईन टाकली होती. शहराची वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा याचा विचार त्यांनी त्याचवेळी केला होता. परंतु प्रशासन व तत्कालीन राज्यकर्त्यांनी या पाईपलाईनची जपणूक केली नाही. पाच किलोमीटरची ही पाईपलाईन ३५० मिमी व्यासाची होती. आता ही पाईपलाईन अस्तित्वात असती तर यवतमाळकरांना गोखी प्रकल्पाचे पाणी विनासायास मिळाले असते. पाणीटंचाईच्या काळात सव्वा कोटी रुपयांचा खर्च आणि एक ते दीड महिन्याचा कालावधीही लागला नसता. सध्या नगरपरिषद एमआयडीसी जलशुद्धीकरण केंद्रावरून टँकरद्वारे पाणी आणण्याचे नियोजन करीत आहे. तेही करावे लागले नसते. नगरपरिषदेचे लाखो रुपये वाचले असते आणि शहराच्या अनेक भागाला या टाकीवरून पाणीपुरवठा झाला असता.
या भागाला मिळाला असता दिलासा
गोखी प्रकल्पाचे पाईप सुस्थितीत ठेवले असते तर वडगाव, लोहारा, वाघापूर या जुन्या ग्रामपंचायत क्षेत्रातील वसाहतींना पाणीपुरवठा झाला असता. सध्या दर्डानगर टाकीवरून दर्डानगर परिसर, वाघापूर परिसर, उज्वलनगर, शोभादेवी मंगल कार्यालय परिसर, एसटी कॉलनी, अमराईपुरा, बिजवे ले-आऊट, सुभाषनगर, परोपटे ले-आऊट, पृथ्वीराजनगर, वनवासी मारोती मंदिर परिसर, महाबलीनगर, रविराजनगर, समतानगर, जांब रोड, मुंगसाजीनगर, गोविंदनगर, दांडेकर ले-आऊट, मुलकी, ओम कॉलनी, महादेवनगर, रेणुकानगर, विकास कॉलनी, भाग्योदयनगर आदी परिसराला पाणी पुरवठा केला जातो. ही पाईपलाईन अस्तित्वात असती तर आज पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या नसत्या. त्याची तीव्रता निश्चित कमी झाली असती आणि प्रशासनाचे सव्वा कोटी रुपयेही वाचले असते.
आधी प्राधान्य एमआयडीसीला
अर्ध्या यवतमाळ शहराची तहान भागविली जाईल एवढा पाणीसाठा सध्या गोखी प्रकल्पात आहे. मात्र प्रथम प्राधान्य औद्योगिक क्षेत्रालाच राहणार आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन शहराला पाणीपुरवठ्याविषयी नियोजन केले जाईल. एमआयडीसी ते दर्डानगर पाईपलाईनशी एमआयडीसीचा कुठलाही संबंध नाही. पाणी पुरविणे एवढीच जबाबदारी एमआयडीसीची होती. त्याचा मोबदलाही घेतला जात होता. आताही घेतला जाईल, पण प्राधान्य एमआयडीसीला राहील, असे एमआयडीसीचे उपअभियंता हेमंत कुळकर्णी यांनी सांगितले.