ऑनलाईन व्यवहार जरा जपून, 117 जणांना लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 05:00 AM2021-12-25T05:00:00+5:302021-12-25T05:00:57+5:30
क्रेडिट कार्डवर ऑफर आहे. मी तुम्हाला फाॅर्म पाठवितो. हा फाॅर्म भरून घेतला जातो. यावेळी एटीएम कार्डवरील शेवटचे चार आकडे भरण्यास सांगितले जातात. अशावेळी घात होतो. आपल्याला लाॅटरी लागली आहे. हे पैसे मिळविण्यासाठी जीएसटी लागते. यासाठी पहिल्यांदा अमूक खात्यावर पैसे पाठवा, असे सांगितले जाते. अशावेळी ग्राहकांनी पैसे पाठवू नये.
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ऑनलाईन व्यवहारात पैसा दिसत नाही. यामुळे त्याचे मूल्यही नागरिकांना राहिलेले नाही. हाच धागा पकडून सायबर क्राईम वाढले आहे. जिल्ह्यात ऑनलाईन व्यवहारांमध्ये ११७ जणांना गंडा घातला गेला आहे. यातील दहा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. फेसबुक आणि व्हाॅट्सॲप हॅक करून मॅसेज पाठविण्यात आले आहे.
व्यवहार जपूनच करा
अलीकडे प्रत्येकांकडे स्मार्ट फोन आले आहेत. या फोनच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातला जात आहे. मोबाईल कसा वापरावा, यासाठी फोन दुसऱ्याच्या हातात दिला जातो. याच ठिकाणी घात होतो.
- अमोल पुरी,
प्रभारी अधिकारी, सायबर सेल
वर्षभरात लाखोंची फसवणूक
- चोरी, दरोडे, लुटमार यासाठी व्यक्तींना प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची गरज नाही. आता ऑनलाईन दरोडा पडू शकतो. अशाच पद्धतीने लाखो रुपये हॅकरने लाटले आहेत.
ऑनलाईन फ्लाईटचे तिकीट बुक करणे महागात पडले
- यवतमाळातील एका ग्राहकाने विदेशात जाण्यासाठी ऑनलाईन तिकीट बूक केले. त्यासाठी एक लाख १५ हजार रुपये संबंधितांकडे वळते केले. यानंतर त्याला फ्लाईटचे तिकीट पाठविण्यात आले. मात्र, या तिकिटावर विदेशातील व्यक्तीचे नाव होते. या व्यक्तीने थेट सायबर सेलशी संपर्क साधला. यानंतर युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या. एक लाख १५ हजार रुपये परत मिळाले.
- मक्याची कणसं खरेदी करण्यासाठी एका शेतकऱ्याने तीन लाख रुपये समोरच्या व्यक्तीच्या खात्यात टाकले. आता हे पैसे तर बँकेत वळते झाले. मात्र, शेतमाल पाठविणारा व्यक्ती ऑनलाईन होता, आता तो दिसत नाही.
ऑनलाईन फसवणूक झाली तर...
- फसवणूक झाल्यानंतर तात्काळ लगतच्या ठाण्यात जावून त्याची माहिती संबंधितांना द्यावी, अन्यथा सायबर सेलशी प्रत्यक्ष संपर्क साधावा. यामुळे गुन्हेगाराला रोखण्यास मदत होईल.
...तर थोडे सावधान
क्रेडिट कार्डवर ऑफर आहे. मी तुम्हाला फाॅर्म पाठवितो. हा फाॅर्म भरून घेतला जातो. यावेळी एटीएम कार्डवरील शेवटचे चार आकडे भरण्यास सांगितले जातात. अशावेळी घात होतो.
आपल्याला लाॅटरी लागली आहे. हे पैसे मिळविण्यासाठी जीएसटी लागते. यासाठी पहिल्यांदा अमूक खात्यावर पैसे पाठवा, असे सांगितले जाते. अशावेळी ग्राहकांनी पैसे पाठवू नये.
मोबाईल समजत नसल्याने स्क्रीन शेअर करण्यासाठी पुढील व्यक्ती सांगतात. यावेळी स्क्रीन शेअरिंग अप्लिकेशन समोरच्या व्यक्तीच्या हातात दिले जाते. यामुळे आपला पूर्ण व्यवहार समोरच्यांना माहिती होतो.
आपल्याला मोफत माहिती मिळावी आणि शेअर बाजार यातून तुमच्या खिशात पैसे यावे, यासाठी गुंतवणूक करा, असे सांगितले जाते. मुळात कुठल्याही बँका सांगत नाही.