जादूटोणाविरोधी कायद्यामुळे महाराष्ट्राची मान अधिक उंचावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:18 AM2017-12-01T01:18:27+5:302017-12-01T01:18:38+5:30
अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही कुण्याही धर्माविरुद्ध नसून समाजातील वाईट प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा संमत केल्याने अनेक अपराध्यांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ ही कुण्याही धर्माविरुद्ध नसून समाजातील वाईट प्रवृत्तींना वठणीवर आणण्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा संमत केल्याने अनेक अपराध्यांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले. मानवी जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणाºया या कायद्यामुळे देशात महाराष्ट्राची मान उंचावली गेली आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव यांनी केले.
ते येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या महात्मा जोतिबा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्वात ‘वृक्ष तिथे छाया, बुवा तिथे बाया व जादूटोणाविरोधी कायदा’ या विषयावर मंगळवारी बोलत होते. मोक्षप्राप्तीच्या नावावर स्त्रियांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शारीरिक व मानसिक शोषण करणारे अनेक ढोंगी आज जेलमध्ये आहे. ते केवळ या कायद्यामुळे शक्य झाल्याचे श्याम मानव म्हणाले. तरीदेखील समाजात अंधश्रद्धेच्या बाबतीत सर्व व्यापक जागृतीची गरज असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने संत गाडगेबाबा राज्यस्तरीय प्रबोधन अभियानांतर्गत राज्यभर जनजागृती सुरू असल्याचे प्रा.मानव म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.के. कोडापे होते. यावेळी एकनाथ डगवार, प्रज्ञा चौधरी, धीरज वाणी, डॉ.रत्नपारखी, डॉ.पीयूष बरलोटा, डॉ.अलोक गुप्ता, सुरेश झुरमुरे, बंडू बोरकर, मृणाल बिहाडे, ज्ञानेश्वर गोरे, कवडू नगराळे, विलास काळे, सुनीता काळे, माया गोरे, संजय बोरकर, शशिकांत फेंडर, सुनील वासनिक, माधुरी फेंडर, प्रा.माधव सरकुंडे, रियाज सिद्धीकी, विनोद बुरबुरे, संजय बोरकर आदींसह असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.