परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:35 AM2017-10-17T01:35:45+5:302017-10-17T01:36:44+5:30

गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. 

Soyabean loss due to fall! | परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान!

परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान!

Next
ठळक मुद्दे बाजारभावात घसरण  शेतकर्‍यांचे बजेट कोलमडतेय

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. 
सन २0१६ चा अपवाद वगळता मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकर्‍यांवर नानाविध संकटे ओढवली होती. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने अपेक्षित उत्पादन झाले; मात्र शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडली होती. गतवर्षीचे चांगले-वाईट अनुभव पचवित यावर्षीदेखील खरीप हंगामात शेतकर्‍यांनी मोठय़ा आनंदात पेरणी केली. यावर्षी चार लाख नऊ हजार हेक्टरपैकी सव्वा दोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसात सातत्य नसल्याने तसेच ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अशातच परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दाणादाण उडविली. गत आठवड्यात चार ते पाच दिवस परतीचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात सोंगून करून ठेवलेले सोयाबीन मोठय़ा प्रमाणात भिजले. 
तीन ते चार दिवसात फारसा खंड न दिल्याने शेतकर्‍यांना सोंगून ठेवलेले सोयाबीन वाळवितादेखील आले नाही. त्यामुळे आता भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी फारच खालावल्याचे दिसून येत आहे. सव्वा दोन लाख हेक्टरपैकी जवळपास ७0 ते ८0 हजार हेक्टरवरील सोयाबीनला परतीच्या पावसाने जबर हाणी पोहोचविल्याची भीती कृषी विभागानेदेखील वर्तविली आहे. गत तीन दिवसांपासून परतीचा पाऊस नसल्याने मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. तथापि, भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी घसरल्याने १२00 ते १५00 च्या दरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचा दावा शेतकर्‍यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. बाजार समित्यांमध्ये भिजलेले सोयाबीन कवडीमोल भावाने घेतले जात असल्याने शेतकर्‍यांचे बजेट पुरते कोलमडून जात आहे. ऐन दिवाळीदरम्यान अशी परिस्थिती ओढवल्याने अल्प भूधारक शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढवले. अगोदरच उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट; त्यातही परतीच्या पावसाने लावलेला ‘डाग’, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे दिसून येते. परतीच्या पावसामुळे सोयाबीन भिजल्याने एक हजार ते १५00 रुपयादरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचे किनखेडा येथील शेतकरी गजानन अवचार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 

Web Title: Soyabean loss due to fall!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती