Extension to the irrigation wells in Amravati division | अमरावती विभागातील धडक सिंचन विहिरींना मुदतवाढ
अमरावती विभागातील धडक सिंचन विहिरींना मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द करण्यात आलेल्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांच्या विहिरी पुनर्जिवित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश आहे. या संदर्भात शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायकराव मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विहिरींना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
धडक सिंचन योजनेंतर्गत अमरावती विभागातील ८००७ सिंचन विहिरी पुनर्जिवित करण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली होती. त्यातील बहुतांश विहिरी विविध कारणांमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. सदरच्या रद्द केलेल्या विहिरी पुनर्जिवित करण्यासाठी नव्याने लक्षांक देण्याबाबत लोकप्रतिनिधींकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. यात शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायकराव मेटे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या विहिरी पुनर्जिवित करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी ११ डिसेंबर रोजी पत्र पाठवून केली होती. त्याची दखल घेऊन अमरावती विभागातील धडक सिंचन योजनेंतर्गत रद्द झालेल्या विहिरी पुनर्जिवित करण्याबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शासनाकडून विभागस्तरावर देण्यात आले. यात वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेकडो विहिरींचा समावेश होता. या संदर्भात विभागीय आयुक्तांनी वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील किती विहिरी रद्द झाल्या आहेत आणि त्यापैकी किती पुनर्जिवित करावयाच्या आहेत. याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता धडक सिंचन योजनेतील रद्द झालेल्या विहिरी पुनर्जिवित होणार आहेत.


Web Title: Extension to the irrigation wells in Amravati division
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.