पटपडताळणीत अडकणार विद्यार्थ्यांचे जादा प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 04:27 PM2019-07-08T16:27:41+5:302019-07-08T16:27:55+5:30

पटपडताळणीदरम्यान जादा प्रवेश रद्द होणार असल्याने, महाविद्यालयांच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागण्याची भीती वर्तविली जात आहे.

Additional admission of students to get trapped | पटपडताळणीत अडकणार विद्यार्थ्यांचे जादा प्रवेश

पटपडताळणीत अडकणार विद्यार्थ्यांचे जादा प्रवेश

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : इयत्ता अकरावीतील प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून, काही कनिष्ठ महाविद्यालयात क्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिले जात आहेत. पटपडताळणीदरम्यान जादा प्रवेश रद्द होणार असल्याने, महाविद्यालयांच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना भोगावी लागण्याची भीती वर्तविली जात आहे.
यावर्षी इयत्ता दहावीचे एकूण १५ हजार १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २१ हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. जिल्ह्यात अनुदानित ८०, विना अनुदानित ६१, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यित २६ अशा एकूण १६७ कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी संख्येनुसार अकरावीच्या २७३ तुकड्या आहेत. यामध्ये अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या १११ वर्गतुकडीत ८८८० जागा, विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या  ११२ वर्गतुकडीत ८९६० जागा, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित कनिष्ठ महाविद्यालयाच्या ५० वर्गतुकडीत चार हजार जागा उपलब्ध आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला २२ जूनपासून सुरूवात झाली असून, १३ जुलैपर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत. केंद्रीय प्रवेश पद्धतीला फाटा देत जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वंयअर्थसहाय्यित उच्च माधमिक, कनिष्ठ महाविद्यालयस्तरावर राबविली जात आहे. काही विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती दिली जात असल्याने तेथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. प्रत्येक शाखेतील विद्यार्थी प्रवेश क्षमता निश्चित केली असून, त्यानुसारच कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश द्यावे, असे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने यापूर्वीच दिले आहेत. तथापि, शिक्षण विभागाचे निर्देश झुगारून काही कनिष्ठ महाविद्यालयांनी जादा प्रवेश दिले आहेत. यासंदर्भात शिक्षणाधिकारी कार्यालयाकडेदेखील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पटपडताळणी केली जाणार असून, क्षमतेपेक्षा जादा प्रवेश आढळून आल्यास सदर प्रवेश मान्य केले जाणार नाहीत, असे शिक्षणाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले. कनिष्ठ महाविद्यालयांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तविली जात आहे. 

दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेत जिल्ह्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी जवळपास सहा हजार अधिक जागा उपलब्ध आहेत. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये अशा सूचना मुख्याध्यापक, प्राचार्यांना दिलेल्या आहेत. पटपडताळणीदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश मान्य केले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी घ्यावी तसेच विद्यार्थी व पालकांनीदेखील विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयाचा हट्ट न धरता जेथे रिक्त जागा आहेत, तेथे प्रवेश घ्यावे.
- टी.ए. नरळे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वाशिम

Web Title: Additional admission of students to get trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.