त्सुनामीचा इशारा आणि प्रशासनाची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 07:22 PM2018-09-04T19:22:23+5:302018-09-04T19:25:56+5:30

Tsunami warning and running for administration | त्सुनामीचा इशारा आणि प्रशासनाची धावपळ

त्सुनामीचा इशारा आणि प्रशासनाची धावपळ

ठाणे - अरबी समुद्रात इराण जवळ आज सकाळी ९ मॅग्निटयूडचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला.... जमिनीखाली १० किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असून इतक्या क्षमतेच्या धक्क्यामुळे भारतीय पश्चिम समुद्र तटाला सुनामीचा मोठा धोका पोहचू शकतो, असा  इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना केंद्र आणि इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सेंटरने सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी दिला ..... आणि पहाता पहाता अग्निशमन दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका, पोलिसांच्या गाड्यांनी उत्तन भागातील पाली गावांत प्रवेश केला.

त्सुनामी येतेय.. सुरक्षित ठिकाणी चला अशी हाकाटी मारत पोलीस पाटील मेलविन पॉल आंद्रादे धावू लागले. २५ मिनिटांच्या आत एनडीआरएफ आणी पोलीस यांनी गावाचा अक्षरश: ताबा घेतला आणि सुमारे शंभरावर लोकांना सुरक्षित स्थळी म्हणजे उत्तन मच्छीमार वाहतूक सोसायटीच्या मदार तेरेसा हॉलमध्ये आणले.   

विशेष म्हणजे ठाण्याहून ३६ किलोमीटर अंतरावरील या गावातील प्रत्येक जण जिल्हा प्रशासनाने सकाळपासून घेतलेल्या या मॉक ड्रिलमध्ये होता. महिलांची उपस्थितीही खूप होती. उपजिल्हाधिकारी पुनर्वसन उपेंद्र तामोरे, उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार अधिक पाटील, एनडीआरएफचे सिंग, मीरा भाईंदर महानगरपालिका उपायुक्त  पुजारी, पोलीस निरीक्षक पवार, नायब तहसीलदार नंदकिशोर देशमुख, मंडळ अधिकारी अनारे, तलाठी शेडगे, हे अधिकारी व कर्मचारी यात गावकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यात दोन अग्निशमन गाड्या, दोन रुग्णवाहिका, दोन शहर बसेस देखील सहभागी झाल्या होत्या.

काही जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेत आणण्यात आले तर बसेसमधून सुमारे शंभर एक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.      

भारतीय राष्ट्रीय महासागर सुचना केंद्र, हैद्राबाद  ( इंडियन नेशनल सेंटर फॉर ओशन इन्फोर्मेशन सर्व्हिसेस) तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आज देशातील पश्चिम समुद किनाऱ्यांवरील राज्यांमध्ये ही रंगीत तालीम घेण्यात आली. पालघर जिल्ह्यात येडवन, ठाणे जिल्ह्यात पाली, रत्नागिरीत पाजपंढरी, रायगड जिल्ह्यात बोरली, सिंधुदुर्ग येथे जामडूल येथे सुनामी आल्यास किनार्यावरील गावकऱ्यांनी काय काळजी घ्यावी व कसा बचाव करावा तसेच स्थानिक प्रशासनाने देखील कसा समन्वय ठेवून काम करावे असा उद्देश या तालमीमागे होता.

या मॉक ड्रिलची पूर्व तयारी काही दिवसांपासून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होती व त्यात महसूल विभागाचे कर्मचारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार पोलीस, मीरा भाईंदर पालिका, अग्निशमन दल, स्थानिक मच्छीमार, असे अनेक जण सहभागी होते अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली.

गावांतील महिलांनी उत्स्फुर्तपणे या रंगीत तालमीच्या वेळी प्रशासनाला व पोलिसाना सहकार्य केले तसेच त्सुनामी मध्ये घ्यावयाची काळजी यावर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांनी दाखविलेल्या प्रात्यक्षिकांना दाद दिली. या जवानांनी संकटांमध्ये होड्या, जीव रक्षक साधनांचा कसा वापर करायचा ते प्रत्यक्ष सर्वाना दाखविले.

उपेंद्र तामोरे हे नुकतेच सुनामी संदर्भात हैद्राबाद येथे प्रशिक्षण घेऊन आले आहेत, त्यांनी गावकऱ्यांना या रंगीत तालमीमागची भूमिका समजावून सांगितली. उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी यांनी सुनामीचा इशारा मिळाल्यानंतर निश्चितपणे रहिवाशांनी काय करायला पाहिजे आणि या आपत्तीचा वेग आणि व्याप्ती किती मोठी असू शकते ते सांगितले.

या रंगीत तालमीची काय आवश्यकता होती असे सुरुवातीला आम्हाला वाटले पण खरोखरच या सगळ्यांचे ऐकल्यानंतर त्याची गरज पातळी, आम्हाला खूप महत्वाची माहिती मिळाली, सुनामीच नव्हे तर पूर परिस्थिती देखील आपण काय काळजी घ्यावी हे कळल्याचे नागरिक डिमेलो यांनी सांगितले.

Web Title: Tsunami warning and running for administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.