विविध मागण्यांकरिता शांती मार्च
By admin | Published: January 17, 2017 01:11 AM2017-01-17T01:11:24+5:302017-01-17T01:11:24+5:30
ज्येष्ठ नागरिक व निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने मंगला ठक यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी पायदळ शांती मार्च काढण्यात आला.
आमदारांना साकडे : ज्येष्ठ नागरिक व निराधार अत्याचारमुक्ती संघर्ष समितीचे आंदोलन
हिंगणघाट : ज्येष्ठ नागरिक व निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्यावतीने मंगला ठक यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांसाठी पायदळ शांती मार्च काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्त्याानी विविध मागण्यांचे निवेदन आ. समीर कुणावार यांना त्यांच्या निवासस्थानी सादर केले.
निवेदनातून, दिवसेंदिवस महागाईचा भस्मासुर गोरगरीब व निराधार लाभार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे जगणे कठीण करीत आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीचा दरडोई खर्च किमान १०० रूपये आहे. परंतु, शासन श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनेतील तसेच निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमाह ६०० रूपये अनुदान देत आहे. ही निंदनिय बाब आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना १ हजार ५०० रूपये इतके मासिक वाढीव अनुदान देण्यात यावे, लाभार्थ्यांच्या पात्रतेकरिता उत्पन्नाची मर्यादा ३५ हजारापर्यंत वाढविण्यात यावी, लाभार्थ्यांना भारतात कुठेही रेल्वेने मोफत व सवलतीच्या दरात प्रवास करता यावा, त्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यात याव्या आदी मागण्यांचे निवेदन आमदार कुणावार यांना देऊन मागण्या शासनदरबारी रेटून वंचितांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आंदोलन कर्त्यांनी या वेळी केली.(तालुका प्रतिनिधी)