संपूर्ण विमा ग्राम योजनेकडे ग्रामस्थांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:32 IST2018-09-03T00:31:51+5:302018-09-03T00:32:43+5:30
ग्रामीण भागातील नागरिकांनाही विम्याचे कवच देता यावे. त्यांच्या दु:खाच्या प्रसंगी त्यांना आर्थिक आधार मिळावा या हेतूने केंद्र सरकारने डाक विभागाच्यावतीने संपूर्ण विमा ग्राम योजना कार्यान्वीत केली. या योजनेची वर्धा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १३ गावांची निवड करण्यात आली.

संपूर्ण विमा ग्राम योजनेकडे ग्रामस्थांची पाठ
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ग्रामीण भागातील नागरिकांनाही विम्याचे कवच देता यावे. त्यांच्या दु:खाच्या प्रसंगी त्यांना आर्थिक आधार मिळावा या हेतूने केंद्र सरकारने डाक विभागाच्यावतीने संपूर्ण विमा ग्राम योजना कार्यान्वीत केली. या योजनेची वर्धा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १३ गावांची निवड करण्यात आली. तेथील रहिवासी असलेल्या कमीत कमी ९ हजार ६४८ नागरिकांचा विमा काढणे क्रमप्राप्त असताना आतापर्यंत केवळ २ हजार ६२६ नागरिकांनाच विम्याचे कवच देण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे.
सुमारे १०० वर्षांपासून नागरिकांना सूविधा देणारे डाक विभाग बदलत्या काळानुसार कात टाकत आहे. नुकतीच डाक विभागाकडून आॅनलाईन पासपोर्ट नोंदणी सेवा सुरू करण्यात आली आहे. ती सेवा नागरिकांसाठी फायद्याचीही ठरत आहे. परंतु, काही योजना केवळ कागदावरच राहत असल्याचे दिसून येते. दु:खाच्या प्रसंगी ग्रामीण भागातील नागरिकांनाही आर्थिक आधार मिळावा म्हणून केंद्र सरकारने संपूर्ण ग्राम विमा योजना सुरू केली. शिवाय त्याच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी डाक विभागावर सोपविली. वर्धा जिल्ह्यात सदर योजनेची प्रभावी अंमल बजावणी करण्यासाठी गत वर्षी तरोडा या एका गावाची निवड करण्यात आली होती. पण त्यानंतर सदर योजनेसाठी आणखी १२ गावांची निवड करण्यात आल्याने ही संख्या १३ इतकी झाली. सदर १३ गावांमधील प्रत्येक कुटुंबातील एकाला विम्याचे कवच देणे असे गृहीत धरून ९ हजार ६४८ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, निवडलेल्या १३ गावांमधील केवळ २ हजार ६२६ ग्रामीण नागरिकांनाच आतापर्यंत विम्याचे कवच देण्यात आले आहे. त्यामुळे सदर योजनेच्या प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.
सांसद आदर्श ग्रामच्या दिव्याखाली अंधार
संपूर्ण विमा ग्राम योजनेचा एक भाग म्हणून सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या पारडी व मदनी या दोन्ही गावातील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला डाक विभागाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या माध्यमातून विम्याचे कवच देण्याचे निश्चित करण्यात आले. या दोन्ही गावांमध्ये एकूण १ हजार ८१ जणांना विम्याचे कवच देणे क्रमप्राप्त होते. परंतु, आतापर्यंत केवळ १०२ जणांनाच विम्याचे कवच देण्यात आल्याने योजनेची प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.
या गावांची झाली निवड
डाक विभागाच्या संपूर्ण विमा ग्राम योजनेसाठी तरोडा, कोरा, मंगरूळ (द.), आर्वी छोटी, आजणसरा, घोराड, सालोड (हि.), कवठा, सोनोरा (ढो.), गौळ, पिंपळगाव (लु.), चिस्तूर, सेलसूरा या गावांची निवड करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही या गावांमधील ६ हजार ८०७ नागरिकांना विम्याचे कवच देण्यात आले नसल्याचे वास्तव आहे.
वयानुसार ठरतो विम्याचा हप्ता
डाक विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या संपूर्ण विमा ग्राम योजना ही जिल्ह्यातील १३ गावांमध्ये राबविली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विम्याचे कवच देणे हा सदर योजनेचा मुख्य उद्देश आहे. विम्याचे कवच घेणाºयाच्या वयोमर्यादेवर विम्याचा हप्ता निश्चित केला जातो. शिवाय त्याला विम्याचे कवच दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
संपूर्ण विमा ग्राम योजनेसाठी जिल्ह्यातील १३ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमधील २ हजार ६२६ ग्रामस्थांना आतापर्यंत विम्याचे कवच देण्यात आले आहे. प्राप्त झालेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
- एम.बी. लाखोरकर, अधीक्षक, डाकघर,वर्धा.