पुढे आलू मागे दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:03 PM2018-01-04T22:03:56+5:302018-01-04T22:04:10+5:30
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारूविक्री करताना अनेक क्लृप्त्या काढत असल्याचे दिसून आले आहे. वर्धेत होत असलेले हे प्रकार आता चंद्रपुरातही होत असल्याचे दिसते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारूविक्री करताना अनेक क्लृप्त्या काढत असल्याचे दिसून आले आहे. वर्धेत होत असलेले हे प्रकार आता चंद्रपुरातही होत असल्याचे दिसते. याच प्रकारातून मालवाहूत समोर आलू (बटाटे) आणि त्याच्या मागे दारूच्या पेट्या नेत असलेले वाहन समुद्रपूर पोलिसांनी जप्त करून चंद्रपूर येथील दोन दारूविक्रेत्यांना अटक केली.
दीपक मलच्या मंचनवार रा. बाबुपेठ व योगेश देशराज शाहू रा. गाडगेबाबा चौक जि. चंद्रपूर अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल दीड लाख रुपयांची विदेशी दारू जप्त केली. इतर साहित्यासह एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
समुद्रपूर पोलीस, गुरुवारच्या सकाळी ७.३० ते ८.३० वाजताच्या दरम्यान जाम चौरस्ता येथे नाकेबंदीवर होते. दरम्यान त्यांना एमएच ३४ बीजी १६५ क्रमांकाच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर येथे दारूसाठा जात असलेल्या असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सदर क्रमांकाच्या वाहनाची झडती घेतली असता आलूचा कॅरेटच्या मागे मोठ्या प्रमाणात दारूसाठा असल्याचे दिसमन आले. वाहनाची तपासणी केली असता आलू भरलेल्या ४७ कॅरेटच्या मागे विदेशी दारूच्या ८० पेट्या असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. यात दीपक मंचनवार व योगेश शाहू या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्य मार्गदर्शनाखाली पीएसआय श्रीकांत कडू, गणेश इंगोले, प्रेमराज अवचट, राहुल गिरडे, संजय सूर्यवंशी, नितीन ताराचंदी, गजानन कठाणे, यशवंत गोल्हर यांनी केली.