सख्या बहिणींचं शेजारील गावच्या सख्ख्या भावांशी लग्न; सासरी पोहचताच नववधू दागिने घेऊन फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 02:11 PM2023-11-24T14:11:21+5:302023-11-24T14:11:37+5:30
दोन सख्या बहिणींनी दोन सख्ख्या भावांशी विवाह करून त्यांचा काटा काढल्याची अनोखी घटना समोर आली आहे.
हरदोई : दोन सख्या बहिणींनी दोन सख्ख्या भावांशी विवाह करून त्यांचा काटा काढल्याची अनोखी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. इथे दोन बहिणींनी कट रचून सख्ख्या भावांना खीरमध्ये मादक पदार्थ मिसळून खायला दिले. यानंतर मौल्यवान वस्तू घेऊन दोघीही फरार झाल्या. एका दलालाने दोन सख्ख्या भावांचे या मुलींशी लग्न लावले होते, ज्यासाठी त्याने ८० हजार आकारले.
लग्न जुळवण्यासाठी दलालाने संबंधित दोन भावांकडून मोठी रक्कम घेतली. पैसे मिळाल्यानंतर दलालाने एका मंदिरात लग्न लावून दिले. रितीरिवाजानुसार दोन्ही वधू सासरी पोहचल्या आणि पतींना खीर बनवून दिली. खीरमध्ये त्यांनी मादक पदार्थ मिसळून प्यायला दिले. मग दुसऱ्या दिवशी दोघेही भाऊ झोपेतून उठले तर या बहिणींनी घरातील मौल्यवान वस्तू आणि पैसे घेऊन पळ काढला होता. याप्रकरणी संबंधितांनी स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नववधू दागिने घेऊन फरार
प्रदीप पाल (३०) आणि कुलदीप पाल (२७) अशी दोन सख्ख्या भावांची नावे आहेत. त्यांची आई अंध आहे. आपल्या मुलांचे लग्न होत नसल्याने कुटुंबीय त्रस्त होते. मग त्यांनी दलालाचा आधार घेत ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, जे त्यांच्या चांगलेच अंगलट आले. प्रदीप दिल्लीत एका खासगी कंपनीत काम करतो, तर कुलदीप गावीच असतो. दलालाने दोन सख्या बहिणींचे फोटो पाठवले. पाल कुटुंबीयांना देखील मुली पसंत पडल्या आणि त्यांनी लग्नासाठी होकार कळवला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार वधूंसाठी सुमारे एक लाख रुपयांचे दागिने बनवले होते. ठरल्याप्रमाणे २२ नोव्हेंबर रोजी एका मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात लग्न लागल्यानंतर दोन्हीही वधू आणि वर घरी आले. घरी आल्यानंतर नववधूंनी घरच्यांसाठी खीर बनवली. खीर खाल्यानंतर सर्वांना सुस्ती आली आणि सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा नववधूंनी लग्नाचे दागिने, रोख रक्कम आणि घरातील मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या. यानंतर दरोडेखोर नववधूंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, सखोल तपास केल्यानंतर आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात येईल.