उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम ठप्प, भुयारी गटाराच्या कामानंतरच रस्त्याला मुहूर्त

By सदानंद नाईक | Published: April 16, 2024 05:33 PM2024-04-16T17:33:54+5:302024-04-16T17:34:23+5:30

६८ कोटीचा निधी भुयारी गटारीच्या कामामुळे गेल्या एका वर्षापासून पडून

Work on Kalyan-Ambernath road in Ulhasnagar has stopped, the road will be opened only after the work of underground sewerage. | उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम ठप्प, भुयारी गटाराच्या कामानंतरच रस्त्याला मुहूर्त

उल्हासनगरातील कल्याण-अंबरनाथ रस्त्याचे काम ठप्प, भुयारी गटाराच्या कामानंतरच रस्त्याला मुहूर्त

सदानंद नाईक, उल्हासनगर : शहरातून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी आलेला ६८ कोटीचा निधी भुयारी गटारीच्या कामामुळे गेल्या एका वर्षापासून पडून आहे. गटारीच्या कामानंतरच रस्त्याच्या कामाला मुहूर्त लागणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानकर यांनी दिली आहे.

 उल्हासनगराच्या मधून जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने, काही वर्षांपूर्वी रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणात ८५० पेक्षा जास्त दुकाने व घरे बाधित झाली असून त्यापैकी १५०पेक्षा जास्त दुकाने पूर्णतः बाधित झाली. बाधित झालेले बहुतांश दुकानदार पर्यायी जागेच्या प्रतीक्षेत आहेत. तर काहीजणांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्याने, आजही १० ते १२ बांधकामे रस्त्याला अडथळा ठरली आहे. रस्त्याच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने तीन टप्प्यात ६८ कोटीचा निधी मंजूर केला. दरम्यान संपूर्ण शहरात भुयारी गटारीचे काम सुरू असून नव्याने गटारीचे पाईप टाकण्यात येत आहे. कल्याण ते अंबरनाथ रस्त्या खालील भुयारी गटारीचे पाईप नव्याने टाकण्यात येणार असल्याने, रस्ता पुनर्बांधणीपूर्वी भुयारी गटारीचे काम त्वरित करा. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मानकर यांनी महापालिकेला लेखी सुचविले. 

महापालिका व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची बैठक होऊन भुयारी गटारीचे काम जलद करण्याचा निर्णय झाला. भुयारी गटारीचे काम झाल्यानंतरच रस्ताचे काम सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र गेल्या तीन महिन्यापासून गटारीचे काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. असेच काम सुरू राहिल्यास, पावसाळ्यानंतरच रस्त्याचे काम सुरू होण्याची संकेत महापालिका व बांधकाम विभागाचे अधिकारी खाजगीत बोलतांना देत आहेत. शहरातील भुयारी गटारीच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी रस्ते व गटारीच्या कामाची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिले. मात्र भुयारी गटारीसाठी खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने, शहराचे धुळीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे.

गटारीच्या कामानंतर रस्त्याला मुहूर्त

शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ आहे. ही वर्दळ कमी करण्यासाठी रस्त्यावर ६५५ कोटीच्या निधीतून उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. तर भुयारी गटारीच्या कामानंतरच ६८ कोटीच्या निधीतून रस्त्याच्या पुनर्बांधणीला मुहूर्त लागणार आहे.

Web Title: Work on Kalyan-Ambernath road in Ulhasnagar has stopped, the road will be opened only after the work of underground sewerage.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.