भाजपची खेळी यशस्वी होणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:23 AM2019-04-29T00:23:18+5:302019-04-29T00:23:28+5:30

राजकारणात कोण कधी मित्र होईल किंवा शत्रू होईल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणामध्ये सतत सतर्क राहावे लागते. सत्ता स्थापनेसाठी भाजपने साई पक्ष, ओमी टीमची मदत घेतली.

Will the BJP be successful? | भाजपची खेळी यशस्वी होणार का?

भाजपची खेळी यशस्वी होणार का?

Next

सदानंद नाईक

राजकारणात कोण कधी मित्र होईल किंवा शत्रू होईल, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणामध्ये सतत सतर्क राहावे लागते. सत्ता स्थापनेसाठी भाजपने साई पक्ष, ओमी टीमची मदत घेतली. मात्र, लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होऊन राजकीय गणितेच बदलून गेली आहेत. त्यामुळे स्थायी सभापतीपदाच्या निवडणुकीत काय होते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेना यांची महापालिकेच्या सत्तेत युती होणार का? एकत्र आल्यास सत्तेत स्थान काय? आदींची चर्चा शहरात सुरू झाली. स्थायी समिती सदस्यांची निवड होऊन सभापती निवडणुकीत ओमी टीम व साई पक्षाला दूर सारून शिवसेनेच्या मदतीने सभापतीपद भाजप स्वत:कडे ठेवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सहा महिन्यांपूर्वी महापौर निवडणुकीच्यावेळी आमने-सामने उभे ठाकलेले शिवसेना व भाजपा पक्षांचे नेते लोकसभा निवडणुकीतील युतीमुळे एकत्र आले. युती होताच दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते गळ्यात गळे घालून फिरू लागल्याने सत्ताबदलाचे वारे वाहू लागले. महापालिकेवर भाजप, ओमी टीम व साई पक्षाची सत्ता असली, तरी दोनअडीच वर्षांमध्ये त्यांच्या नेत्यांत व नगरसेवकांत मनोमिलन झाले नाही. त्यांच्यातील अनेक वाद चव्हाट्यावर आले. महापौर, स्थायी समिती सभापतीपदासह इतर पदांबाबत त्यांच्यात वाद होऊन विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत ओमी टीमने थेट शिवसेनेसोबत हातमिळवणी करून सभापतीपद पदरात पाडून घेतले. तर, एका सभापतीपदाची शिवसेनेला लॉटरी लागली होती.

महापालिकेत भाजप व ओमी कलानी टीमचे एकूण ३२ नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी १५ पेक्षा जास्त नगरसेवक ओमी समर्थक आहेत. ओमी समर्थक नगरसेवक कधीही भाजपच्या बैठकीला गेले नाही. तसेच महापौर, उपमहापौर, विशेष व प्रभाग समिती सभापतीपदावरून दरवर्षी रुसवेफुगवे सुरूच आहेत. भाजप व शिवसेना एकत्र आल्यास महापौरांसह इतर पदेही युतीकडे राहणार असून शहर विकास साधल्याचे बोलले जाते. भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या ३२ पैकी १५ पेक्षा जास्त नगरसेवक कट्टर भाजप समर्थक आहेत, तर शिवसेनेचे २५ नगरसेवक निवडून आले आहेत. १५ व २५ असे एकूण ४० नगरसेवक युतीचे असून महापालिकेत बहुमताचा आकडाही ४० आहे. अशा परिस्थितीत ओमी टीम व साई पक्षासह इतर लहान पक्षांची मदत घ्यावी लागणार नाही.

दरम्यान, स्थायी समितीच्या आठ सदस्यांसाठी २ मे रोजी निवडणूक होत आहे. भविष्यातील युतीचा विचार करूनच भाजप हा ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांना डावलून कट्टर भाजप समर्थक नगरसेवकांना स्थायी समितीत पाठवणार आहे. स्थायी समितीत भाजप-६, साई- ३, शिवसेनेचे- ५ व राष्ट्रवादी व रिपाइं प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. शिवसेना व भाजप एकत्र आल्यास स्थायी समिती सभापतीपद शिवसेना किंवा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. एकूणच शहरातील राजकारण बघता लोकसभा निवडणुकीनंतर ओमी टीम व साई पक्ष अडगळीत जाण्याची शक्यता आहे. किंवा भाजप व शिवसेना ठरवेल, ती पदे घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

सात नगरसेवकांवर विरोधी पक्षाची जबाबदारी
राष्ट्रवादीचे- ४, भारिप, पीआरपी व काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी १ असे एकूण सात नगरसेवक विरोधी पक्षाची भूमिका वठवण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीसह महासभेत कधीही शिवसेना आक्रमक दिसली नाही. उलट, सत्ताधारी पक्षाने आणलेल्या प्रत्येक विषयाला मंजुरी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

Web Title: Will the BJP be successful?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.