सत्तेसाठी काय पण...! शिवसैनिकही झाले चौकीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:48 AM2019-04-02T03:48:45+5:302019-04-02T03:49:23+5:30

शिवसैनिकही झाले चौकीदार : पक्षाचे अस्तित्व पणाला लावल्याचा आरोप

But what about power ...! Shiv Sainik too became the watchman | सत्तेसाठी काय पण...! शिवसैनिकही झाले चौकीदार

सत्तेसाठी काय पण...! शिवसैनिकही झाले चौकीदार

Next

अजित मांडके 

ठाणे : चौकीदार चोर है... असा नारा देणारे शिवसैनिकही आता म्हणू लागले आहेत, मैं भी चौकीदार हूँ...! त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक मात्र चांगलाच चक्रावला आहे. काही नगरसेवकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हा नारा दिला आहे. शिवसेनेच्या या घूमजावामुळे सत्तेसाठी काय पण, असा संदेश मतदारांमध्ये जात असून, ठाणे लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारासाठी सेनेच्या वाघाने भाजपपुढे नांगी टाकल्याचेही बोलले जात आहे.

राज्यभरात विविध ठिकाणी मेळावे घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या इतर महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी चौकीदार चोर है... असा नारा देत विरोधकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता; परंतु आता लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे; मात्र ही युती केवळ पक्षस्तरावर असून, बऱ्याच ठिकाणी युतीच्या कार्यकर्त्यांचे अद्यापही मनोमिलन झालेले नाही.
या कार्यकर्त्यांच्या डोक्यात हळूहळू का होईना, अब की बार, फिर से मोदी सरकार... हा नारा उतरवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेत्यांकडून होऊ लागला आहे; मात्र यामुळे शिवसेना आपले स्वत:चे अस्तित्व गमावत असल्याची टीका होऊ लागली आहे. परंतु, युती नव्हती, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी काही चुका झाल्या असतील, परंतु आता युती झाली असल्याने, झाले गेले विसरून एकदिलाने काम करण्याचा संदेश दोन्ही पक्षांतील वरिष्ठ मंडळी कार्यकर्त्यांना देत आहेत.
राजकीय गरज म्हणून भाजपशी युती करण्यापर्यंत ठीक होते; परंतु भाजपसोबत मैं भी चौकीदार हूँ... असा नारा देऊन शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आपले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस आणि टिवटर हॅण्डलही त्याच आशयाचे ठेवत असल्याने पक्षाचे अस्तित्वच पणाला लावल्याचे निष्ठावंत शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.

तळागाळातील शिवसैनिक युती मान्य करायला तयार नाहीत. परंतु, पक्षप्रमुखच अमित शहांची गळाभेट घेत असतील, तर आम्ही वाद कशाला घालायचे, असे म्हणत ते दिलजमाई करू लागलेत. परंतु सेनेकडून दिला जाणारा मै भी चौकीदारचा नारा म्हणजे शिवसैनिकांना अतिशयोक्ती वाटत आहे. त्यामुळे शिवसेना भाजपच्या ताटाखालचे मांजर झाल्याची भावना शिवसैनिकांच्या मनात घर करू लागली आहे. सेनेचा ढाण्या वाघ संपला असून सत्तेसाठी काय पण करण्याची तयारी केल्याने त्याचे पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.

Web Title: But what about power ...! Shiv Sainik too became the watchman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.