वनवासींच्या ताई हरपल्या... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पटवर्धन यांचे निधन

By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 10, 2024 07:12 PM2024-01-10T19:12:31+5:302024-01-10T19:13:05+5:30

वनवासींच्या ताई हरपल्या, चोवीस पुरस्कारांच्या मानकरी

Veteran social worker, Sunanda Patwardhan passed away | वनवासींच्या ताई हरपल्या... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पटवर्धन यांचे निधन

वनवासींच्या ताई हरपल्या... ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पटवर्धन यांचे निधन

ठाणे : ज्येष्ठ सामाजिक  कार्यकर्त्या, प्रगती प्रतिष्ठान या जव्हार परिसरात १९७२ पासून कार्यरत असलेल्या बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापिका सुनंदा पटवर्धन यांचे वृद्धापकाळ आणि अल्पशा आजाराने वयाच्या ८५ व्या वर्षी खाजगी रुग्णालयात आज निधन झाले. येथील राम मारुती मार्गावर त्यांचा निवास होता. पटवर्धन यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि तीन नातवंड असा परिवार आहे. 

वाई येथील हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले होते. नाशिक येथील भोसला मिलट्री शाळेतून त्यांनी मिलट्री ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला होता. मूळच्या वाई येथील असलेल्या सुनंदाताई लग्नानंतर १९५६ पासून ठाणे येथे वास्तव्यास आल्या होत्या. त्यांचे पती वसंत पटवर्धन हे सामाजिक आणि राजकीय कामात सक्रिय होते. सुनंदाताई यांनी घर, संसार, कुटुंब सांभाळून आपल्या पती सोबत सामाजिक कामाला सुरुवात केली होती. महिलांचे आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन यासाठी त्या काम करत असत. 

तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील वनवासी भागातील माणसांचे खडतर जगणे पाहून अस्वस्थ झालेल्या सुनंदाताई पटवर्धन यांनी जव्हार हे आपले कार्यक्षेत्र ठरवले. ठाणे ते जव्हार असा प्रवास सुरु केला. स्थानिक मंडळींना विश्वासात घेतले. संपर्क वाढवला. कायमस्वरूपी प्रकल्पातून जनजाती बांधवांचे जगणे सुसह्य करण्याची योजना तयार केली. त्यातून १९७२ साली प्रगती प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेची स्थापना त्यांनी केली. अखेरच्या श्वासापर्यंत त्या पटवर्धन कार्यरत होत्या. कर्णबधिर विद्यालयासह जलसंधारण, कृषी विकास, नळपाणी योजना, महिला बचत गट, शेतीविषयक कामं, पोषक आहार आणि कौशल्याधारित प्रशिक्षण यातून जव्हार आणि परिसरात शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी सुनंदाताई पटवर्धन यांनी विशेष कार्य केले होते. विविध संस्था, व्यक्ती, उद्योजक यांना जोडून प्रगती प्रतिष्ठानच्या कामाचा विस्तार केला आहे. 

त्यांच्या कार्याची दखल घेऊन मान्यवर, प्रतिष्ठित २४ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सुनंदाताई यांच्या निधनाने जव्हार परिसर पोरका झाल्याची भावना आहे. वनवासींच्या ताई हरपल्या आहेत.  त्यांच्या  निधनाने ठाण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.

Web Title: Veteran social worker, Sunanda Patwardhan passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.