वाहतूककोंडी मुक्त शहर आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- विवेक फणसाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 08:47 PM2018-07-31T20:47:43+5:302018-07-31T21:06:29+5:30

कायदा सुव्यवस्थेबरोबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येकाशी समन्वय ठेवूनच काम करण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.

Top priority for the traffic free city and security of citizens- Vivek Phansalkar | वाहतूककोंडी मुक्त शहर आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य- विवेक फणसाळकर

मंगळवारी दुपारी घेतली ठाण्याची सूत्रे

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी दुपारी घेतली ठाण्याची सूत्रेप्रत्येकाशी समन्वय ठेवूनच काम करण्यावर भरसर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला सिंग यांना निरोप

ठाणे : वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका करणे, कायदा सुव्यवस्थेबरोबर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रत्येकाशी समन्वय ठेवूनच काम करण्यावर आपला भर राहील, अशी ग्वाही ठाण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली. मावळते आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडून मंगळवारी दुपारी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी हा मनोदय व्यक्त केला.
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास २२ वे पोलीस आयुक्त म्हणून ठाण्याची सूत्रे त्यांनी घेतली. ठाण्यात आधी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केल्यामुळे परिचित असलेल्या ठाण्याची जबाबदारी मोठी आहे. ती प्रामाणिक आणि चोखपणे काम करून पार पाडणार असल्याचे ते म्हणाले. ठाण्यात गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्थेची अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे ठाणेकरांना चांगली सेवा देण्यात पोलीस बांधील राहतील. कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी प्रतिबंध आणि अन्वेषण तसेच वाहतूककोंडीतून ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि भिवंडी या शहरांची मुक्तता होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. पोलिसांच्या कल्याणासाठीही चांगल्या योजना राबविण्यात येतील. ठाण्यात सायबर, आॅनलाईन फसवणूक आणि सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले, इलेक्ट्रॉनिकच्या वापरावर नागरिकांचा अधिक भर असल्यामुळे त्यादृष्टीने पोलीस सक्षम आणि नागरिकांमध्ये जागृकता वाढविणार भर दिला जाईल. ठाणेच नव्हे तर राज्यभरात मराठा मोर्चा आणि आंदोलनाची परिस्थिती पोलिसांनी अत्यंत संयमीपणे हाताळली. नागरिकांचेही सहकार्य लाभल्यास पोलिसांना गुन्हेगारांचा बिमोड करणे सोपे होईल. काही वर्षांपूर्वी ठाण्यात अतिरेकी पकडले गेल्याच्या पार्श्वभूमीवर एटीएस आणि स्थानिक पोलीस यांच्यातही समन्वय ठेवूनच काम केले जाईल. गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच कोणतेही आणि कसलेही गुन्हेगार असले तर कठोर कारवाई केली जाईल आणि सर्व सामान्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
.......................................
ठाणे पोलीस यापुढेही चांगले काम करतील- परमवीर सिंग
फणसाळकर यांना ठाण्याची सूत्रे सुपूर्द केल्यानंतर राज्य मुख्यालयात कायदा सुव्यवस्था विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी बदली झालेले मावळते आयुक्त परमवीर सिंग म्हणाले, मुंबई पोलीस आयुक्त पदापेक्षाही राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणे ही देखील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. ठाणे पोलिसांनी गेल्या तीन वर्षांच्या आपल्या कार्यकाळात अगदी आंतरराष्टÑीय पातळीवरील काम केले. मग ते इफेड्रिन असो की, कॉल सेंटरमधील फसवणूक किंवा पेट्रोल भेसळीचा भंडाफोड अशा अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. यापुढे आपल्या पश्चातही फणसाळकर यांच्या अधिपत्याखाली ठाणे पोलीस अशीच चांगली कामगिरी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही सिंग यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Top priority for the traffic free city and security of citizens- Vivek Phansalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.