हक्कासाठी झगडणा-या वृद्धाला दिली अटक करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:25 AM2018-02-13T03:25:27+5:302018-02-13T03:25:37+5:30

बिल्डरने कमी आकाराचे घर दिल्याविरोधात तक्रार न घेणाºया विष्णूनगर पोलिसांनी बिल्डरचे ऐकून धमकी दिल्याचा आणि दबावाखाली स्टेटमेंट लिहून घेतल्याचा आरोप ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने केल्याने एकच खळबळ उडाली.

Threatens to arrest and confront victim | हक्कासाठी झगडणा-या वृद्धाला दिली अटक करण्याची धमकी

हक्कासाठी झगडणा-या वृद्धाला दिली अटक करण्याची धमकी

Next

डोंबिवली : बिल्डरने कमी आकाराचे घर दिल्याविरोधात तक्रार न घेणाºया विष्णूनगर पोलिसांनी बिल्डरचे ऐकून धमकी दिल्याचा आणि दबावाखाली स्टेटमेंट लिहून घेतल्याचा आरोप ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने केल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी कल्याण परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार करीत न्यायाची याचना केली; त्यांच्या नातीने पोलिसांच्या वागणुकीची माहिती ट्विट करत मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री, खासदारांसह पोलीस आयुक्तांना दिल्याने सूत्रे हलली.
कोपरगावला राहणारे झिपा सीताराम म्हात्रे (वय ७५) यांनी आपली जमीन सुंदरा बिल्डर्सना २००७ साली विकसित करण्यास दिली होती. मात्र करारनाम्याप्रमाणे जागा दिली नसल्याचे लक्षात आल्याने फसवणूक झाल्याची लेखी तक्रार त्यांनी ५ फेब्रुवारीला विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिली. पण पोलिसांनी त्यांना न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. तोवर झिपा म्हात्रे यांनी घरांना कुलूप लावल्याविरोधात बिल्डरने ८ फेब्रुवारीला पोलिसांत तक्रार दिली आणि मी म्हात्रे यांना ४०० चौरस फुटांचे क्षेत्र देण्यास तयार असल्याचे लिहून दिले. त्याची दखल घेत पोलिसांनी झिपा म्हात्रे आणि त्यांच्या मुलांना दुसºयाच दिवशी पोलीस ठाण्यात येऊन म्हणणे मांडण्यास हजर राहण्यास सांगितले. झिपा यांनी कारण विचारता, ही तक्रार महत्वाची वाटल्याचे उत्तर संबंधित पोलिसांकडून देण्यात आले. त्यावर सामान्य नागरिकाने केलेली तक्रार महत्वाची वाटत नाही असा यातून अर्थ काढायचा का? असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला. ९ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात गेलेल्या झिपा म्हात्रे आणि त्यांच्या मुलांना अटक करण्याची धमकी देत पोलिसांनी घरांना लावलेली कुलपे काढण्याचे आदेश देत दबाव टाकला, असा आरोप करून म्हात्रे यांनी आमची कुलपे तोडून बिल्डरने घरांना स्वत:ची कुलपे लावली, असा दावा केला. पोलिसांच्या धमकीने घाबरलेल्या झिपा म्हात्रे यांनी अखेर याप्रकरणी कल्याण परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना १० फेब्रुवारीला लेखी पत्र देत पोलिसांनी दिलेल्या वाईट वागणुकीमुळे तसेच धमक्यांमुळे आमच्याकडून जबरदस्तीने काहीतरी लिहून घेतल्याने मला किंवा घरातील अन्य सदस्यांना कोणताही मानसिक ताण आला किंवा काही बरेवाईट झाले तर त्याला सर्वस्वी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी, बिल्डर कचरु पाटील हे जबाबदार राहतील, असे म्हटले आहे.

‘पोलिसांनी बिल्डरची बाजू घेतली’
आम्ही आमची बाजू पोलिसांसमोर मांडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, पोलीस शेवटपर्यंत बिल्डरची बाजू घेत राहिले. पोलिसांच्या पाठिंब्यामुळे घरांना आम्ही लावलेली कुलपे बिल्डरने फोडून स्वत:ची कुलपे लावली. मी माझ्या हक्काच्या घरांना कुलूप लावले होते. स्वत:च्या घराला कुलूप लावणे जर गुन्हा असेल तर मला लगेच अटक करण्यात यावी. पोलिसांकडून मला देण्यात आलेल्या वागणुकीचा मी निषेध करीत आहे. पोलिसांच्या दबावाखाली लिहून दिलेले स्टेटमेंट मला आणि माझ्या मुलांना मान्य नाही. जर ही तक्रार न्यायालयीन आणि दिवाणी स्वरुपाची असेल, तर त्याची पोलिसांनी दखल देणे आणि आम्हाला अटक करण्याची धमकी देणे पूर्णपणे चुकीचे आहे, असे म्हणणे झिपा म्हात्रे यांनी मांडले.

पोलिसांचा इन्कार : हे प्रकरण आणि वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याने दोन्ही पक्षांना न्यायालयात जाऊन न्याय मिळवण्याबाबत सूचित केल्याचे स्पष्टीकरण विष्णूनगर पोलिसांनी दिले. दिवाणी प्रकरणात पोलीस हस्तक्षेप करु शकत नाहीत. पण झिपा म्हात्रे यांचा काय गैरसमज झाला आहे, आम्हाला माहित नाही. दोघांनाही १४९ अंतर्गत नोटीस दिली आहे. पोलिसांनी कोणाकडून जबरदस्तीने लिहून घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत पोलिसांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला आहे.

धमकी दिली नाही : पाटील
झिपा म्हात्रे यांच्यासोबत झालेल्या करारानुसार त्यांना त्यांचा हिस्सा देण्यात आला आहे. मी टीडीआर विकत घेतला होता. त्याचा एफएसआय द्यायचा नाही, असे करारामध्ये ठरले होते. आर्किटक्टच्या सांगण्यानुसार मी त्यांना ४०० चौरस फूट जागा देण्यास तयार आहे. हे प्रकरण सामोपचाराने मिटावे, अशी माझी इच्छा आहे. मी कोणतीही अरेरावी केली नाही, असे म्हणणे बिल्डर कचरु पाटील यांनी मांडले.

Web Title: Threatens to arrest and confront victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा