आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास वाचवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:33 AM2018-08-13T03:33:53+5:302018-08-13T03:34:22+5:30

दारूच्या नशेत वर्तकनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवरून रविवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या बेतात असलेल्या सुरेश भास्कर गोडेराव (३४, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाचवले.

 The survivor tried to save himself | आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास वाचवले

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यास वाचवले

Next

ठाणे : दारूच्या नशेत वर्तकनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवरून रविवारी दुपारी आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या बेतात असलेल्या सुरेश भास्कर गोडेराव (३४, रा. भीमनगर, ठाणे) याला वर्तकनगर पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून वाचवले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी किरकोळ काम करणारा सुरेश वर्तकनगरनाक्यावरील ‘माळवे हाउस’ या सहा मजली इमारतीत आत्महत्येच्या उद्देशाने १२ आॅगस्ट रोजी दुपारी शिरला. तसे त्याने गेटवरच एका रहिवाशाला सांगितले. ही माहिती मिळताच काही रहिवाशांनी ठाणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. तेथून वर्तकनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. वर्तकनगर बीट क्रमांक-१ चे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप अलगुडे आणि नवनाथ ढाकणे यांना हा प्रकार काही नागरिकांनी सांगितला. ते कळताच या दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता या इमारतीकडे धाव घेतली. त्यावेळी इमारतीच्या खालून अनेकजण त्याला ‘मागे हो, उडी टाकू नको’, असे सांगून आत्महत्या करण्यापासून परावृत्त करत होते. तोपर्यंत अलगुडे आणि ढाकणे यांनी गच्चीवर जाऊन सुरेशला ताब्यात घेतले. त्याने सुरुवातीला नाव आणि पत्ता सांगण्यासही नकार दिला. मात्र, नंतर स्वत:ची आणि कुटुंबाची माहिती दिली.

कुटुंबीयही आश्चर्यचकित

त्याची आई जनाबाई आणि मोठा भाऊ नारायण गोडेराव यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले. पोलिसांच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. कोणताही वाद नसताना त्याने असे का पाऊल उचलले, याबाबत कुटुंबीयांनीही आश्चर्य व्यक्त केले.

Web Title:  The survivor tried to save himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.