सुशोभीकरणाच्या नावाखाली उधळपट्टी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:06 AM2018-11-12T05:06:35+5:302018-11-12T05:06:55+5:30

शहरात पूर्वी ६५ तलाव होते. आता त्यात घट झाली असून केवळ ३५ च्या आसपास तलाव शहरात शिल्लक आहेत.

Smoothing in the name of beautification? | सुशोभीकरणाच्या नावाखाली उधळपट्टी?

सुशोभीकरणाच्या नावाखाली उधळपट्टी?

Next

ठाण्याची चौपाटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाचे सहा वर्षांपूर्वी तीन कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यानंतर, पुन्हा या तलावासाठी वारंवार कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. आता पुन्हा खासदार निधी आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुशोभीकरणाचा नारळ वाढवण्यात आला आहे. यापूर्वी याठिकाणी अ‍ॅम्पी थिएटर, लेझर शो आदी सुविधा करण्यात येणार होत्या. त्याचे प्रस्ताव तयार झाले होते. यासाठी सल्लागारांवर लाखोंची उधळण झाली होती. परंतु, त्यानंतर त्याचे पुढे काय झाले, याचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. २०१६ पासून या तलावाच्या सुशोभीकरणाच्या मुद्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच तलावावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात श्रेयवादाची लढाई झाली होती. या दोघांनीही सुशोभीकरणाचा विडा उचलला होता. परंतु, यातील काही कामे झाली, तर काही तशीच राहिली. आधीच पाच कोटींचा चुराडा झाल्यानंतर आता शहरातील इतर तलावांच्या सुशोभीकरणाकडे लक्ष देण्याऐवजी वारंवार याच तलावाकडे पालिका आणि राजकारण्यांचे लक्ष का जात आहे? कदाचित, बहुतांश ठाणेकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हाच तलाव असल्यामुळे हे होत असावे.

शहरात पूर्वी ६५ तलाव होते. आता त्यात घट झाली असून केवळ ३५ च्या आसपास तलाव शहरात शिल्लक आहेत. त्यातही मागील काही वर्षे केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच तलावांचे सुशोभीकरण वारंवार केले जात आहे. मासुंदा तलाव तर यासाठी प्रसिद्ध असून एक ते दीड वर्षाच्या फरकाने येथे काही ना काही कामे केली जात आहेत. परंतु, केलेल्या कामांची देखभाल ठेवली जात नसल्याने त्यावर केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात आहे. यापूर्वी मासुंदा तलावाचे २००९ मध्ये सुशोभीकरण करण्यात आले होते. यामध्ये तलावाचा कठडा बांधणे, नागरिकांना बसण्यासाठी बाकडे बसवणे, विद्युत रोषणाई, चार जॉगिंग ट्रॅक, विविध स्वरूपाची वृक्षलागवड, कृत्रिम घाट, कारंजे, गेट आणि तलावातील पाणी बायोमेट्रीक पद्धतीने शुद्ध करून आणि बाहेरून येणाºया पाण्यावर फिल्टरेशनचा प्लान्ट बसवणे आदी कामे करण्यात आली, असा दावा पालिकेने केला होता. परंतु, त्यातील कारंजी, बाकडे आणि इतर काही किरकोळ कामेवगळता इतर कामे झाली किंवा कसे, हा संशोधनाचा विषय आहे. तलावाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर १३ कारंजी उभारण्यात आली. परंतु, सहा वर्षे उलटली, तरी आजही ती बंद असून कारंज्यांचे सात व्हॉल्व्ह गायब आहेत. कारंज्यांचा लखलखाट पाहावयास मिळावा, म्हणून रंगीबेरंगी लाइट्स लावण्यात येणार होते. त्यासाठी केबल टाकण्यात आल्या. परंतु, या केबल चोरीला गेल्या आहेत. तसेच येथील डीपी उघड्यावर असून येथे शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा तलाव नकाशावर जरी चांगला वाटत असला तरी, प्रत्यक्ष या तलावाचा फेरफटका मारला, तर समस्यांची खोली नजरेत भरते.
सत्तरच्या दशकात सेंट जॉन स्कूल आणि कौपिनेश्वर मंदिरामधील रस्त्यात मोठा भराव घालून नवा स्टेशन रस्ता आणि रंगायतनसाठीची जागा तयार होत असताना ठाण्याची ‘चौपाटी’ नगर परिषदेने साकारली. ४० वर्षांपूर्वी ठाण्याची लोकसंख्या पाच लाखांच्या घरात होती. आता ही लोकसंख्या २२ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे मासुंदा तलाव अधिकच गजबजून गेला आहे. पूर्वी याठिकाणी असंख्य फेरीवाले, टांगेवाले होते. मात्र, ठाणेकरांना याठिकाणी फेरफटका मारण्यास त्रास होत असल्याने महापालिकेने २००२ मध्ये शहरातील प्रवासी टांगेवाहतूक गुंडाळली.

ठाण्याची चौपाटी अशी ओळख असलेल्या मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणाच्या नावे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली गेली. मात्र, अजूनही या तलावाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव दिसतोच आहे. आता महापालिका व खासदार निधीतून पुन्हा सुशोभीकरणाचा घाट घातला गेला आहे. त्याचत्याच कामांना गोंडस नावे दिली जात आहेत, असे आरोप होत आहे.

२००९ पर्यंत मासुंदा तलावाचा परिसर हा टांग्यापासून मोकळा झाला. २०१० मध्ये शासकीय अध्यादेशानुसार भरगर्दीच्या शहरांमधून सर्वच प्रकारच्या प्राण्यांच्या संचाराला बंदी करण्यात आली. चौपाटीवरील शोकेस घोडागाड्याही अनेक ठिकाणी नव्या चौपाट्या विकसित करून तिकडे पिटाळल्या. या घोडागाड्या वागळे, साकेत, कोलशेत येथे गेल्या. मात्र, हा प्रयत्न सपशेल फसला असून नव्या जागांमध्ये एकही टांगा दिसत नसून मासुंदा चौपाटीवर मात्र ऐनगर्दीच्या ठिकाणीच टांगेवाल्यांची लांबलचक रांग दिसते.

राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत या तलावाचे सुशोभीकरण केले जाणार होते. यासाठी ४३ लाख ४० हजारांचा खर्च केला जाणार होता. केवळ महिनाभरात हे सुशोभीकरण आणि लेझर शो सुरू केला जाणार होता. त्याच्या जोडीला म्युझिकल फाउंटन, एलईडी लाइट, साउंड सिस्टीम आणि त्याच्या बाजूलाच अ‍ॅम्पी थिएटर उभारले जाणार होते. ६० बाय ३० मीटरच्या आकारात हा लेझर शो आकार घेणार होता. याची उंची १६ मीटर असणार होती. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारला जाणार होता.

संबंधित ठेकेदाराला हा प्रकल्प १५ वर्षांसाठी चालवण्यासाठी दिला जाणार होता. या कालावधीत देखभालीची जबाबदारी त्याचीच राहणार होती. परंतु, त्याचे पुढे काय झाले, खर्च कुठे केला गेला, याचा थांगपत्ताच पालिकेला नाही. आता पुन्हा नव्याने मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव अलीकडेच झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. यामध्ये तलावाच्या सुशोभीकरणासह इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परंतु, यापुढेही जाऊन तेथील कोंडी लक्षात घेऊन येथे तरंगता पाथ-वे तयार करण्याचा पालिकेचा मानस आहे.

हे कितपत शक्य आहे, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. यासंदर्भातील निविदा काढण्यात आली आहे. लवकरच हे काम सुरू होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला. गेल्या आठवड्यात खासदार निधीतून या तलावाच्या सुशोभीकरणाचा नारळ वाढवण्यात आला. बीओटीच्या प्रस्तावाचे काय झाले, प्रत्येकवेळी करण्यात येणारी कामे सारखीच असल्याचे दिसते. केवळ वेगवेगळी गोंडस नावे दिली जात आहेत. त्या पलीकडे वेगळे काहीच झालेले नाही. कोट्यवधींची उधळपट्टी करूनही मूलभूत समस्या सुटल्या तर बरे होईल, एवढीच माफक अपेक्षा येथे विरंगुळ्यासाठी येणारे नागरिक व्यक्त करत आहेत.
 

Web Title: Smoothing in the name of beautification?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.