‘महिला स्पेशल’साठी स्वाक्षरी मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 11:56 PM2018-12-09T23:56:49+5:302018-12-09T23:57:18+5:30

भाईंदर स्थानकातून सकाळी सुटणारी ९.०६ ची महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

Signature campaign for 'Women's Special' | ‘महिला स्पेशल’साठी स्वाक्षरी मोहीम

‘महिला स्पेशल’साठी स्वाक्षरी मोहीम

Next

मीरा रोड : भाईंदर स्थानकातून सकाळी सुटणारी ९.०६ ची महिला स्पेशल लोकल पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने रेल्वे स्थानक परिसरात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी सुरू झालेली ही मोहीम सोमवारपर्यंत चालणार आहे. महिला स्पेशलच्या मागणीला जोर चढला असून विशेष म्हणजे, प्रवाशांनी देखील या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे. तर, सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेच्या नाकर्तेपणामुळे ही लोकल बंद झाल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला सेलने केला आहे.

अनेक वर्षांपासून भाईंदर स्थानकातून सुटणारी ही महिला स्पेशल १ नोव्हेंबर पासून अचानक बंद करून विरारवरून सोडण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त महिला प्रवाशांनी दोन दिवस भार्इंदर तसेच मीरा रोड स्थानकात रेल रोको केला. भाईंदर स्थानकात आलेल्या भाजपा आणि सेनेच्या लोकप्रतिनिधी तथा पदाधिकाऱ्यांनासुध्दा त्यांनी खडे बोल सुनावले होते.

ही लोकल पुन्हा सुरू करण्यासाठी खा. राजन विचारे यांनी सातत्याने पाठपुरावा चालवला आहे. नुकतीच त्यांनी महिला प्रवासी आणि सेनेच्या शिष्टमंडळासह महाव्यवस्थापकांसोबत बैठक घेतली होती. २५ डिसेंबरपासून विशेष लोकल भाईंदर स्थानकातून पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने या बैठकीत दिले. लोकल सुरू झाली नाही तर आपण रेल रोको करू, असा इशारा विचारे यांनी दिला आहे. तर दुसरीकडे भाजपा आ. नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे माजी आ. मुझफ्फर हुसेन यांनी देखील रेल्वे अधिकाºयांना निवेदन देऊन महिला स्पेशल सुरू करण्याची मागणी केली.

ही विशेष लोकल सुरू होण्यासाठी हुसेन यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून भाईंदर पूर्व आणि पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी अभियानात महिला जिल्हाध्यक्षा लीलाताई पाटील, माजी नगरसेविका सुनिता पाटील, सोहनराज जैन, विकास म्हात्रे, अंकुश मालुसरे, ललिता बिष्ट, विन्सेंट वाझ आदी उपस्थित होते.

मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेर नगरसेविका उमा सपार, मर्लिन डिसा, गीता परदेशी, रुबिना शेख, सारा अक्रम आदींसह महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, गटनेते जुबेर इनामदार आदींनी स्वाक्षरी मोहीम राबवली. शनिवारपासून सुरू झालेली ही मोहीम सोमवारपर्यंत सायं. ६ ते रात्री ९ या वेळेत चालणार आहे.

Web Title: Signature campaign for 'Women's Special'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.