मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी रहिवाशांकडून आलेल्या तब्बल ८७ हजार सूचनांच्या आधारे सत्ताधारी भाजपाने तयार केलेल्या जाहीरनाम्यातील बहुतांश आश्वासने ही शिवसेनेच्या वचननाम्यातील कार्बन कॉपी केल्यासारखी असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भाजपानेही मराठी व हिंदी भाषांत जाहीरनामा प्रसिद्ध केला असला, तरी त्याच्या मराठी प्रती उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत.
शिवसेनेच्या वचननाम्यातील नाट्यगृह, जलवाहतूक, घोडबंदर किल्ला सुशोभीकरण, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना आदी काही मुद्दे भाजपाने जसेच्या तसे उचलले असल्याची चर्चा आहे.
‘मेरा सुझाव’ मोहिमेंंतर्गत ८७ हजार १९५ सूचना नागरिकांकडून मिळाल्याचा दावा भाजपाने केला असून त्यामध्ये रस्त्यांची दुरवस्था, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, अस्वच्छता, पार्किंग व वाहतूककोंडी आदी समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांची ही भावना म्हणजे सत्ताधारी भाजपाच्या अपयशावर ठेवलेले बोट असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या ‘संकल्पपत्र’ या हिंदीतील जाहीरनाम्याचे जीसीसी शाळेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले. महापौर गीता जैन, आमदार योगेश सागर व नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदी या वेळी उपस्थित होते.

जाहीरनाम्यातील आश्वासने
मीरा-भार्इंदर पालिकेची नवी इमारत, मेट्रो, सूर्या पाणीयोजना, भार्इंदर-नायगाव वसई खाडीवरील पूल, दहिसर-भार्इंदर समांतर रस्ता, जेसल पार्क-घोडबंदर रस्ता, सुभाषचंद्र बोस स्टेडियम, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, जलवाहतूक, ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे सुशोभीकरण, नाट्यगृह, पोलीस आयुक्तालय, सिमेंटचे रस्ते, फळ व भाजी मार्केट, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, चौकांचे सुशोभीकरण, शहराचे आकर्षक प्रवेशद्वार, भार्इंदर रेल्वेस्थानकाचे सुशोभीकरण, जेसल पार्क व भार्इंदर चौपाटीचे सुशोभीकरण, आर्ट गॅलरी व क्रीडा प्रशिक्षण, महिला भवन, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, आयटी पार्क आणि इंडस्ट्रियल झोन, नवीन महाविद्यालये, उत्तन येथे दोन जेट्टी, महाराणा प्रताप, एपीजे अब्दुल कलाम, सरदार वल्लभभाई पटेल यांचे पूर्णाकृती पुतळे.