निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठाणे आयुक्तालयात विशेष कक्षाची निर्मिती करणार- विवेक फणसळकर

By जितेंद्र कालेकर | Published: April 13, 2019 09:08 PM2019-04-13T21:08:08+5:302019-04-13T21:19:36+5:30

पोलीस हे समाजातील प्रत्येकाच्या प्रश्नाला सामोरे जातात. अनेकांचे प्रश्न सोडवितात. तरीही त्यांना टीकेचे धनी व्हावे लागते. त्यांच्या कामाचेही कौतुक केले जावे, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केली.

For the retired police personnel, the special cell will be set up in the Thane Commissionerate- Vivek Phansalkar | निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ठाणे आयुक्तालयात विशेष कक्षाची निर्मिती करणार- विवेक फणसळकर

आरोग्याकडे लक्ष द्या

Next
ठळक मुद्देराज्यभरातील ७०० कर्मचाऱ्यांची उपस्थितीआरोग्याकडे लक्ष द्यासंघटनेसाठी मिळणार कार्यालय

ठाणे: निवृत्त पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना भेडसविणा-या समस्या मार्गी लावण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात विशेष कक्षाची निर्मिती करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले. अगदी लहानात लहान गोष्टींचाही आनंद घ्या. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही त्यांनी आपल्या निवृत्त पोलीस कर्मचा-यांना शनिवारी दिला.
ठाणे शहर निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या टीप टॉप प्लाझाच्या सभागृहात पार पडलेल्या ठाणे विभागीय मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पोलीस हे समाजातील प्रत्येकाच्या प्रश्नाला सामोरे जातात. अनेकांचे प्रश्न सोडवितात. तरीही त्यांना टीकेचे धनी व्हावे लागते. त्यामुळेच त्यांनी कसे वागावे, याविषयी कोणीही सल्ला देतो, असा चिमटा त्यांनी शिक्षक आणि पत्रकारांना काढला. पण, पोलिसांच्या चांगल्या कामाचेही जरुर कौतुक केले पाहिजे, असे आवर्जून ते म्हणाले. निवृत्त पोलीस कर्मचा-यांच्या संघटनेसाठी आयुक्तालयात एखादे कार्यालय देण्याची तजवीज करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पोलिसांकडे गरीब- श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. त्यामुळे समाजानेही पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
संघटनेचे अध्यक्ष तथा निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय जाधव म्हणाले, खाकी हाच धर्म ठेवून संघटनेला तडा जाऊ देऊ नका. प्रशिक्षणार्थी अधिकारी असल्यापासून ठाण्याशी आपला संबंध आला. तो आजही कायम आहे. अनेकदा सेवेतील अधिकारी निवृत्त अधिकाºयांना किंवा त्यांच्या संघटनेसाठी वेळ देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. परंतू, पोलीस आयुक्त फणसळकर आणि सह पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी संघटनेला वेळ दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. संघटनेकडून पोलीस खात्यालाही तातडीची मदत लागल्यास ती द्यायला संघटना तयार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी पुलवामा घटनेतील शहीदांसाठी त्यांनी वैयक्तिक मदत पोलीस आयुक्तांच्या हस्ते संघटनेकडे सुपूर्द केली.
..........................
वयाची रौप्यमहोत्सवी करणा-यांचा सत्कार
वयाची ७५ वर्षे अर्थात रौप्यमहोत्सवी वर्षे पूर्ण करणा-या निवृत्त जमादार मारुती ढेरे, अर्जून जाधव, निवृत्ती जानराव, श्रीराम गुजर, एकनाथ पाटील, नारायण पाटील, दत्तात्रय पाटील, जिजाबा शिंदे, खंडू पाटील, रामचंद्र वाघ, दतात्रय जाधव, नरसिंग चव्हाण, वामन भवार तसेच निवृत्त्त उपनिरीक्षक सदाशिव गीते, भगवान चव्हाण, पांडुरंग आव्हाड, दत्तात्रय पाटील, सिताराम भोसले आणि सहायक पोलीस आयुक्त (निवृत्त) शिवाजी देसाई यांचा पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
...........................
हास्याचे फवारे
प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी त्यांच्या खास शैलीत अनेक किस्से आणि कविता सादर करुन सभागृहात हास्याचे फवारे आणि कारंजे निर्माण केले. त्यांनी सादर केलेल्या किश्यांनी संपूर्ण सभागृहाला खळखळून हासविले. पोलिसांशी आपले एक वेगळेच आपुलकीचे नाते असल्याचे ते म्हणाले. पोलिसांचा धाक असलाच पाहिजे. खात्यात पंचनामा किंवा फिर्याद मराठीमध्ये घेतली जाते. त्यामुळे मराठी भाषा जिवंत ठेवणारे पोलीस हा समाजातील एक महत्वाचा घटक असल्याची शाबासकीही त्यांनी खास शैलीत दिली. एकदा निवेदिकेने आता पाहुणे ‘दिवे’ लावतील असा केलेला उल्लेख आणि नूतन वर्ष शहाणपणाचे जावो, अशा शुभेच्छा देणा-या व्यक्तींच्या किस्साही दाद मिळवून गेला.
................
पोलिसांच्या मुलांसाठी रोजगारासह शिष्यवृत्तीच्या योजना असे उपक्रम राबविले जात आहेत. आयआयटी आणि वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आता एनटीएसच्या पोलीस पाल्यांनाही आर्थिक मदत करण्याचा मानस असल्याचे सह पोलीस आयुक्त पांडेय म्हणाले. यावेळी निवृत्त उपायुक्त सुखानंद साब्दे, प्रा. प्रदीप ढवळ, जेष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक खंडेराव शिंदे, रामराव पवार आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.
प्रा. प्रदीप ढवळ आणि हास्य कवी अशोक नायगावकर यांचा संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त फणसळकर यांनी विशेष सत्कार केला.
यावेळी प्रास्ताविकात निवृत्त पोलीस उपायुक्त माधव माळवे यांनी निवृत्तीनंतरच्या पोलिसांच्या व्यथा मांडल्या. संघटना अशा निवृत्त पोलिसांसाठी आपले कार्य करीत असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ठाणे शहर अध्यक्ष माधव माळवे, काशीनाथ कचरे, राजा तांबट, सोपानराव महांगडे, स्मिता पाठक, भास्कर पिंगट, मधुकर भोईर यांच्यासह सर्व पदाधिकाºयांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी राज्यभरातून ७०० कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

Web Title: For the retired police personnel, the special cell will be set up in the Thane Commissionerate- Vivek Phansalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.