म्हसा यात्रेत सुरक्षेचा प्रश्न गंभीर , मंदिर परिसरातच कोंडी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 07:04 AM2018-01-01T07:04:52+5:302018-01-01T07:05:02+5:30

२१० वर्षांची परंपरा असलेली आणि महाराष्ट्रसह देशातील काही राज्यात प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना त्यातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मंदिराच्या परिसरातील गर्दी- कोंडी फोडण्याची गरज आहे.

 The question of security in Mhas Yatra, serious in the temple area | म्हसा यात्रेत सुरक्षेचा प्रश्न गंभीर , मंदिर परिसरातच कोंडी  

म्हसा यात्रेत सुरक्षेचा प्रश्न गंभीर , मंदिर परिसरातच कोंडी  

Next

मुरबाड : २१० वर्षांची परंपरा असलेली आणि महाराष्ट्रसह देशातील काही राज्यात प्रसिद्ध असलेली म्हसा यात्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना त्यातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. मंदिराच्या परिसरातील गर्दी- कोंडी फोडण्याची गरज आहे. त्यातही अनेक दुकानांतील गॅस शेगड्या उघड्यावर आहेत. बहुतांश दुकाने कापडी, गोणपाटाची किंवा प्लास्टिकची असल्याने तेथे सवार्धिक काळजी घेण्याची गरज मुंबईतील दुर्घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
ही यात्रा पौष पौर्णिमेला म्हणजे २ जानेवारीला सुरू होईल. १ जानेवारीला रात्री १२ वाजता भगवान शंकराचा अवतार असलेल्या म्हसोबा खांबलिंगेश्वराची पुजा करण्याच्या मान देवस्थान ट्रस्टने यावर्षी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
सध्या यात्रेसाठी प्रशासन जरी सज्ज झाले असले, तरी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर गॅसच्या शेगड्या लावून मिठाई बनविण्याची दुकाने, थाटलेली आहेत. अन्य व्यावसायिकांकडील गॅस सिलिंडरचा मुक्त वापर पाहता यात्रेत प्रचंड काळजी घेण्याची गरज आहे, याकडे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ (बाळू) पष्टे , सचिव बाळू कुर्ले आणि समितीनेही प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. प्रशासन बैठक घेऊन यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज झाल्याचे घोषित करीत असले, तरी प्रत्यक्षात ते कृतीत उतरत नसल्याने म्हसा यात्रेच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे.
ट्रस्टेने सरकारकडून लाखो रु पये मंजूर करून घेऊन मंदिर परिसराचे सुशोभिकरण करून पेव्हरब्लॉक बसवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी मंदिराच्या सभोवतालची जागा मोकळी सोडली होती. पण ग्रामपंचायतीने मंदिरालगत अगदी चार-पाच फुटांवर मिठाई बनविण्याचे कारखाने व दुकाने यांना परवानगी दिली आहे. तेथे व्यावसायिक गॅस, स्टोव्हचा मुक्त वापर करत आहेत. या व्यावसायिकांकडे अग्नीरोधक यंत्रणाही नाही. शिवाय येथील दुकाने प्लास्टिक- कापड, बांबू, गोणपाट अशा साहित्यापासून बनवलेली असल्याने आघ्गीचा धोका मोठा आहे.

मंदिर परिसरातील जागा सुरक्षेच्या दृष्टीने मोकळी ठेवण्याचा निर्णय ट्रस्ट कमिटीने घेतला होता. परंतु ग्रामपंचायतीने मनमानी करीत दुकाने थाटली. या दुकानांमुळे, त्यांच्या गॅस शेगड्यांमुळे चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडल्यास मोठा हाहाकार उडेल. सीसीटीव्हीचा काही उपयोग होणार नाही. याबाबत प्रशासनाशी बोललो असून जर काही घडले तर त्याला प्रशासन जबाबदार असेल.
- दशरथ (बाळू) पष्टे,
खांबलिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष
सुरक्षेसंदर्भात सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या असून अीग्नशमनची छोटी वाहने यात्रेच्या ठिकाणी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवले आहेत. - सचिन चौधर, तहसीलदार, मुरबाड
यात्रेत प्रथमच इमर्जन्सी लाईट, एलईडी लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर परिसरात ग्रामपंचायत कमिटीने दुकानांना परवानगी दिली असली, तरी त्यांना इतर ठिकाणी हलविण्याचा निर्णय झाला आहे .
- यशवंत म्हाडसे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत म्हसा

अरूंद रस्त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याची देवस्थान ट्रस्टने व्यक्त केली भीती

याच बाजारातून पाच ते सहा फुटांचा अरूंद रस्ता मंदिराकडे जातो. गर्दी पाहता येथे चेंगराचेंगरीची भीती मंदिराशी संबंधित मान्यवरांनी व्यक्त केली आहे. जर आपत्कालीन स्थिती आली, तर अग्निशमन दलाचे वाहन या अरूंद रस्त्यालगतच्या दुकानांमुळे आत येऊ शकत नाही, अशी स्थिती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकूणच सुरक्षिततेच्यादृष्टीने अनेक प्रश्न उभे ठाकलेले आहेत.

म्हसा यात्रेच्या काळात बाजारपेठेत हजार ते बाराशे व्यावसायिक असतात. पण दरवर्षी मागणी करूनही वीज वितरण कंपनीकडून संपूर्ण यात्रेसाठी अवघ्या २२ जणांना वीज जोडण्या दिल्या आहेत. त्यावरून संपूर्ण यात्रेतील दुकाने वीज वापरत असल्याने त्या यंत्रणेवरील ताण लक्षात यावा. काहीजण सरळ मुख्य वीजवाहिनीवर आकडे टाकण्याचा पर्याय स्वीकारतात.

अशा प्रकारच्या असुरक्षिततेमुळे दुर्घटनेची भीती आहे. त्यासाठी यात्रेत काही प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही लावणे गरजेचे होते. यात्रेच्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक तसेच नागरिक येतात. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षिततेच्यादृष्टीने योग्य ती काळजी घेतली पाहिजे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अन्यथा एखादी दुर्घटनाही घडू शकते असे येथे येणाºया नागरिकांचे म्हणणे आहे.
 

Web Title:  The question of security in Mhas Yatra, serious in the temple area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे