‘विद्यादान’मुळेच लाभले आमच्या पंखांना बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:41 AM2019-04-13T00:41:28+5:302019-04-13T00:41:31+5:30

कार्यकर्त्यांची भावना : आज गुणगौरव

The power of our wings, gained due to Vidyaan | ‘विद्यादान’मुळेच लाभले आमच्या पंखांना बळ

‘विद्यादान’मुळेच लाभले आमच्या पंखांना बळ

Next

ठाणे : आर्थिक अडचणींमुळे गुणवत्ता असून अनेकांना उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. अशा मुलांना हेरून त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम ठाण्यातील विद्यादान सहायक मंडळाकडून केले जात आहे. केवळ शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देऊ न न थांबता, चांगली माणसे घडवून आमच्या आशाआकांक्षा उंचावण्याचे काम मंडळाने केल्यानेच आम्ही घडल्याची भावना मंडळाचे कार्यकर्ते पवन वाढे, निलेश हरड आणि कविता बिडवे यांनी व्यक्त केल्या.


शिक्षणामुळे उत्तम समाज घडू शकतो, या विश्वासातून १५ आॅगस्ट २००८ रोजी ठाण्यातील समविचारी व्यक्तींनी विद्यादान मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या माध्यमातून गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. मंडळाच्या स्थापनेला १० वर्षे पूर्ण होत असून, आता संपूर्ण राज्यभरात हे मंडळ हातपाय विस्तारत आहे. शनिवारी या मंडळाच्या मदतीमुळे यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे.


शहापूर तालुक्यातील पवन वाढे हा मंडळाचा कार्यकर्ता आहे. मंडळाच्या मदतीमुळे तो इलेक्ट्रिकल डिस्ट्रिब्युटर म्हणून नावारूपाला आला. वाढे म्हणाला की, माझे वडील व्यसनाच्या आहारी जाऊ न कर्जबाजारी झाले होते. मंडळाने मदत करून माझे मनोधैर्य वाढवले. दहावीनंतर मला नाशिक येथे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश मिळाला. मी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. मंडळ नसते, तर असा विचार केला तरी अंगावर काटा उभा राहतो, अशा शब्दात पवनने भावना व्यक्त केल्या.


शहापूर तालुक्यातील खारिवली गावचा निलेश हरड याचा पत्रकार सुभाष हरड यांच्या माध्यमातून मंडळाशी संपर्क आला. दहावीनंतर मी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन ‘बीएससी अ‍ॅग्रीकल्चर’ हा पर्याय निवडला आणि तेव्हाच स्पर्धा परीक्षा देण्याचे मनाशी पक्के केले. त्यानंतर एक वर्ष कंपनीत काम केले. आता ठाणे महापालिकेत कंत्राटावर उद्यान तपासनीस म्हणून काम करत आहे. त्याचबरोबरच स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करत आहे. मंडळाच्या कार्याचा अभिमान वाटतो, असे निलेशने सांगितले.


ठाण्यातील कविता बिडवे म्हणाली की, मला मायक्रोबायोलॉजीमध्ये बीएससीला प्रवेश घ्यायचा होता. पण, फी परवडत नव्हती. महाविद्यालयांचा शोध घेत असताना राधिका जोशी यांनी मला मंडळाबाबत सांगितले. त्या ठिकाणी आल्यावर गीता शहा यांनी सीएचएम महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सुचवले. २०१६ मध्ये बीएससी पूर्ण झाले. सध्या फार्मसी क्षेत्रातील एका कंपनीत नोकरी करत आहे. मंडळाने सर्वांगीण विकास होण्यासाठीही मदत केली आहे.

आयुष्य घडवणारी संस्था
विद्यादान सहायक मंडळाच्या मदतीने डॉक्टर, इंजिनीअर, नर्स, उपयोजित कला शाखा आणि विविध विद्या शाखांमध्ये २८५ विद्यार्थी शिकत आहेत. तर, साडेतीनशेहून अधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ न स्वत:च्या पायावर भक्कम उभे आहेत.
ठाण्यातील ज्येष्ठ समाजसेवक भाऊ नानिवडेकर, गीता शहा, रंजना कुलकर्णी, स्वाती आगटे या आणि अशा अनेक संवेदनशील व्यक्तींनी सामाजिक जाणीव जपण्याच्या दिशेने १० वर्षांपूर्वी टाकलेले हे सकारात्मक पाऊल अनेकांचे आयुष्य घडवत आहे. ठाणे, पुणे, बोरिवली, शहापूर, नागपूर अशा पाच शाखांतून या मंडळाचा विस्तार झाला आहे.

Web Title: The power of our wings, gained due to Vidyaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.