शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर, पालघरमध्ये फाटक, तर रायगडमध्ये मोरे यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:40 AM2017-10-25T03:40:40+5:302017-10-25T03:40:43+5:30

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी मिशन २०१९ ला शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली

Opposition to Khadak Chawat in Shivsena, gate in Palghar, and more in Raigad More | शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर, पालघरमध्ये फाटक, तर रायगडमध्ये मोरे यांना विरोध

शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर, पालघरमध्ये फाटक, तर रायगडमध्ये मोरे यांना विरोध

googlenewsNext

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी मिशन २०१९ ला शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यासाठी रायगडच्या संपर्कप्रमुखपदी अनुक्रमे अनंत तरे आणि संजय मोरे; तर पालघरच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी आमदार रवींद्र फाटक यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जाहीर होताच नाराजीला तोंड फुटले आहे. फाटक यांना पालघरमधून कट्टर शिवसैनिकांचा विरोध सुरू झाला आहे, तर आपल्या जिल्ह्यात नवा वाटेकरी आणल्याने अनंत तरे हेही नाराज असून त्यांनी वरपर्यंत दाद मागितल्याची चर्चा आहे.
त्यातही मिशन २०१९ च्या नावाखाली नेमकी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातीलच दोन नेत्यांची वर्णी लागल्याने त्यांनी आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चाही शिवसैनिकांत रंगू लागली आहे.
पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार अनंत तरे यांच्याकडून पालघर जिल्हा संपर्कप्रमुख पद काढून घेत त्यांना रायगडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी तरे यांनी या भागातून दोन वेळा खासदारकी आणि एकावेळेला आमदारकीची निवडणूक लढवल्याने हा भाग त्यांच्या परिचयाचा असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. पण पालघरमधील नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला जोरदार धक्का बसल्यानेच तरे यांची येथून उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जाते. तरे यांना रायगड जिल्हाही पूर्णपणे सोपवण्यात आलेला नाही. महाड, श्रीवर्धन, पेण आणि अलिबागची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे; तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचीही रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडे कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरणची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोघांकडे सोपवलेल्या परिसरात शिवसेनेचा एक-एक आमदार आहे. या दोघांची निवड करुन शिवसेनेने पुन्हा एकदा निष्ठावतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु एका जिल्हाचे दोन भाग करण्यात आल्याने त्याबाबत नाराजी आहे.
मोरे हे आगामी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे; तर तरे यांना ठाण्यातून नव्हे तर पुन्हा रायगड जिल्ह्यातूनच शेकाप किंवा राष्ट्रवादीविरोधात आमदारकीची निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच या दोघांना एकच जिल्हा विभागून देत दोघांनाही आपली प्रतिष्ठा वाढविण्याची संधी शिवसेनेच्या श्रेष्ठींनी दिल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांना पालघर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नेमत पक्षाने त्यांच्यावरही विश्वास टाकला आहे. पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी त्यांची नेमणूक झाल्याची चर्चा आहे. परंतु त्यांच्या नावालाही स्थानिक नेत्यांचा विरोध सुरू झाला आहे.
>ठाणे शहराकडे दुर्लक्ष?
अर्थात मोरे आणि फाटक यांच्या नेमणुकीतून ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत बलाढ्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपला कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ अधिक मजबूत केल्याचे मानले जाते. हे दोन्ही नेते वागळे पट्ट्यातील असल्याने त्यांच्या निवडीवरुनही पक्षात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. पालकमंत्र्यांनी केवळ आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी या दोघांची नावे पुढे केल्याची चर्चा सुरू आहे उरलेल्या ठाणे शहरातील नेते, तेथील निष्ठावंतांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Opposition to Khadak Chawat in Shivsena, gate in Palghar, and more in Raigad More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.