नौदलातील सर्जन लेफ्टनंट अनुश्री वर्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 12:49 AM2019-01-26T00:49:05+5:302019-01-26T00:49:12+5:30

भारतीय सैन्यात सुभेदार मेजर म्हणून कार्य केलेल्या आपल्या आजोबांचा वारसा अभिमानाने चालवणाऱ्या नौदलातील सर्जन लेफ्टनंट म्हणजे ठाणेकर डॉ. अनुश्री वर्तक.

Naval Surgeon Lt. | नौदलातील सर्जन लेफ्टनंट अनुश्री वर्तक

नौदलातील सर्जन लेफ्टनंट अनुश्री वर्तक

Next

भारतीय सैन्यात सुभेदार मेजर म्हणून कार्य केलेल्या आपल्या आजोबांचा वारसा अभिमानाने चालवणाऱ्या नौदलातील सर्जन लेफ्टनंट म्हणजे ठाणेकर डॉ. अनुश्री वर्तक. रूग्णसेवेचं व्रत घेतलेल्या अनुश्री सध्या आयएनएचएस अश्विनी, या कुलाबास्थित नेव्हीच्या इस्पितळात कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहेत. ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. याच विद्यालयाच्या आजी विद्यार्थ्यांनी डॉ. वर्तक यांची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घेतलेली ही मुलाखत.
तुमचे शाळेतील आवडते विषय कोणते?
- शाळेत मराठी आणि विज्ञान हे दोन्ही विषय माझ्या आवडीचे होते. नंदिनी बर्वे बार्इंमुळे मला वाचनाची आवड लागली.
तुम्ही डॉक्टर होण्याचे कारण? आणि कशात तज्ज्ञ आहात?
- वैद्यकशास्त्राचा अभ्यास म्हणजे मानवी शरीराशी त्याच्या परिभाषेतून संवाद करायला शिकणे. वैद्यकीय व्यवसाय प्रामुख्याने संवाद कौशल्याशी निगडीत आहे. त्यामुळे मी या क्षेत्राकडे आकर्षित झाले. पेशंटशी मनापासून साधलेला उत्तम संवाद हा उपचारात महत्त्वाचा भाग असतो. मी एमएस करत असताना मला हे प्रकर्षाने जाणवलं, कारण वॉर्डातील दुसºया युनिटचे पेशंटही माझ्या राऊंड्सला हजेरी लावायचे, माझ्या बोलण्याचा डोस घ्यायला ! मी कॅन्सरतज्ज्ञ आहे. कॅन्सरच्या शस्त्रक्रिया करणे हे माझे मुख्य काम. बºयाचदा कॅन्सर आटोक्यात आणण्यासाठी शस्त्रक्रियेबरोबरच किमोथेरपी आणि रेडिएशनची गरज असते. या तीनही उपचार पद्धतीचे तज्ज्ञ टीम म्हणून काम करतात. त्यात आम्हा सर्जन मंडळीचा रोल बहुतांशी ओपनिंग बॅट्समनचा असतो. कॅन्सरला उपचारांचा पहिलाच तडाखा अचूक आणि परखड बसला पाहिजे ही माझी जबाबदारी असते.
डॉक्टर होतानाचे काही अनुभव?
- मी एक भावनाप्रधान व्यक्ती आहे. आॅपरेशन करताना मी पराकोटीची तटस्थ असले, तरी एरवी मी पेशंटच्या सुखदु:खात सहभागी होते. माझ्या १४ वर्षांच्या वैद्यकीय प्रशिक्षणात मी माझी संवेदनशीलता आणि सौंदर्यदृष्टी हरवू दिलेली नाही.
तुम्हाला भारतीय सैन्यदलात आणि तेही नौदलात जावेसे का वाटले ?
- माझे कॅन्सर सर्जरीचे प्रशिक्षण सैन्याच्या सर्वोच्च इस्पितळात म्हणजे दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटल रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल, या ठिकाणाहून झाले. तिथे देशाच्या महामहिम राष्ट्रपतींपासून ते सामान्य जवानांच्या कुटुंबियांचे समभाव आणि समर्पण वृत्तीने उपचार होताना पाहणं, हा भारून टाकणारा अनुभव होता. आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये भरती होता येणं, ही माझं भाग्य आहे. तिथले माझे कॅन्सर सर्जरीचे शिक्षक नौदलातील असल्याने मी ही तीच सर्व्हिस निवडली. नेव्हीशी संलग्न असले तरी तिन्ही दलाचे जवान आणि त्यांचे कुटुंबिय आमच्याकडे उपचारांसाठी येतात.
सध्या कोणती जबाबदारी आहे? नौदलातील कामादरम्यानचा आठवणीतील एखादा प्रसंग सांगाल.
- मी सध्या आयएनएचएस अश्विनी, या कुलाबास्थित नेव्हीच्या इस्पितळात कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहे. कमिशनिंग झाल्यावर पहिल्यांदा युनिफॉर्म घातल्यावर मोठी जबाबदारी घेतल्यासारखं वाटत होतं, पण आता त्यात वावरायची सवय झाली. परेडची शिस्तही अंगवळणी पडली आहे.
तुमची आई सुप्रसिद्ध गायिका, मग तुम्हाला गाण्याची आवड किती आहे ?
- आईच्या विविध कार्यक्रमातील सहभागामुळे, संगीत क्षेत्रातील दिगज्ज मंडळींना जवळून पाहता आलं, चांगलं संगीत ऐकता आलं. पुढे मेडिकल कॉलेजमध्ये सगळी वर्षे मी स्टेजवर गाण्याची हौस भागवली. पण माझ्या स्वरयंत्राच्या मर्यादा मला ठाऊक असल्याने मला स्वत: पुरतं गायला आवडतं. माझा नवरा भारतीय विदेश सेवेत आहे. तो सध्या व्हिएन्नामधील भारतीय दूतावासात काम करत आहे.
शाळेत असतानाच सैन्य दलाविषयी आकर्षण होते का? आणि सैन्यात भरती होताना भीती नाही वाटली?
- आजोबा सैन्यात असल्याने सैन्याविषयी आकर्षण होते. पण माझा चष्म्याचा नंबर आणि वजन बघता मला सैन्यात घेणार नाहीत असं वाटायचं. शाळेत असताना सुट्टीत साहस शिबिरांना गेले होते. तेंव्हा शारीरिक परिश्रमाची जिद्द आणि नवीन गोष्टी शिकण्याचं साहस असल्याची जाणीव झाली. मनालीजवळील साहस शिबिरात प्रशिक्षणाचा भाग म्हणून बर्फाळ आणि जोरदार वाहणारी बियास नदी आम्ही ओलांडली होती. भीती म्हणून कुठल्या अनुभवाला नाही म्हणायचं नाही, हा निर्धार माझ्यात जिज्ञासाने रुजवला. त्याच जोरावर मी आता नौदलाच्या प्रशिक्षणात नवनवीन गोष्टींना सामोरी जात आहे.
>मुलाखतकार : धैर्य खटाटे - ९ वी , सुयोग पवार - ९ वी , हिमांशू पराडकर - ९ वी,
तेजस्विनी पाटील - ८ वी, मानसी तुपे - ८ वी , मार्गदर्शक शिक्षक : सुधीर शेरे

Web Title: Naval Surgeon Lt.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.