ठाण्यातील वाचक कट्ट्यावर रंगल्या 'पत्रसंवादु' च्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 04:27 PM2018-09-08T16:27:19+5:302018-09-08T16:29:18+5:30

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर  'पत्रसंवादु' च्या आठवणी रामदास खरे यांनी उलगडल्या. 

Memories of the 'Letter of Notes' in Thane's readers | ठाण्यातील वाचक कट्ट्यावर रंगल्या 'पत्रसंवादु' च्या आठवणी

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर रंगल्या 'पत्रसंवादु' च्या आठवणी

Next
ठळक मुद्देवाचक कट्ट्यावर रंगल्या 'पत्रसंवादु' च्या आठवणी पत्र स्वरूपात लाभलेला हा त्यांचा जणू महाप्रसाद आहे : रामदास खरे ठाण्यातील साहित्यिकांची उपस्थिती वाचक कट्ट्याची उद्देशपूर्ती करीत आहे : किरण नाकती

ठाणे : हस्ताक्षर पत्रांच्या माध्यमातून मी अनेक लेखक, कवी, समीक्षक, संगीतकरांशी, त्यांनी साकारलेल्या अनेक कलाकृतींशी, पुस्तकांशी आणि सुरांशी नकळत जोडला गेलो. २०१७ मध्ये प्रकाशित झालेल्या 'कॅलिडोस्कोप' आणि दोन महिन्यापूर्वी प्रकाशित झालेल्या 'पत्रसंवादु' या दोन्ही पुस्तकास वाचक-रसिकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला. अनेक वृत्तपत्रांनी, संस्थांनी या पुस्तकाची दखल घेतली यामध्ये माझे कोणतेही कर्तृत्व नसून पुस्तकात साकारलेल्या अनेक प्रतिभावंतांची, लेखक, कवींची ही पुण्याई आहे. पत्र स्वरूपात लाभलेला हा त्यांचा जणू महाप्रसाद आहे असे मत कवी, लेखक, चित्रकार रामदास खरे यांनी वाचक कट्ट्यावर व्यक्त केले. 

 कवी, लेखक, चित्रकार रामदास खरे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'पत्रसंवादु' या पुस्तकाच्या निमित्ताने ठाण्याच्या वाचक कट्ट्यावर गप्पांचा, कविता वाचन, अभिवाचनाचा अभिनव कार्यक्रम आयोजित केला होता. लेखिका, ग्रंथप्रेमी यामिनी पानगावकर यांनी रामदास खरे यांच्याशी सुसंवाद साधला आणि त्यांना बोलते केले. रामदास खरे यांनी पत्रसंस्कृतीबद्दलची आपली भूमिका मांडून काही प्रतिभावंतांच्या खुमासदार, दुर्मिळ आठवणी कट्ट्यावर जागवल्या. या आठवणींच्या प्रवासात रामदास खरे यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, दुर्गाबाई भागवत, म. पां. भावे, जगदीश खेबुडकर, गो. नी. दांडेकर, सुहास शिरवळकर, स्नेहलता दसनूरकर, विद्याधर करंदीकर, डॉ. आनंद यादव, बाळ राणे, अरविंद ताटके, शिरीष पै, या लेखक कवींच्या बरोबरच संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, पं. यशवंत देव, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर यांच्या आठवणी जागवल्या, काही किस्से सांगितले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, बहरत गेला. रामदास खरे यांनी आपल्या स्वतःच्या काही कविता देखील पेश केल्या. कार्यक्रमास अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. ज्येष्ठ समीक्षक डॉ.अनंत देशमुख, दिघे, कवी विकास भावे, कवी प्रकाश पोळ, तसेच अभिनय कट्ट्याचे अनेक कलाकार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास तरुणांची उपस्थिती ही सुखावून गेली. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या 'सर्वात्मका सर्वेश्वरा' या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. तरुणाईला वाचनाची गोडी निर्माण व्हावी व वाचन संस्कृती जिवंत रहावी याकरिताच वाचक कट्ट्याची निर्मिती करण्यात आली व ठाण्यातील साहित्यिकांची उपस्थिती वाचक कट्ट्याची उद्देशपूर्ती करीत आहे असे मत वाचक कट्ट्याचे प्रमुख किरण नाकती यांनी व्यक्त केले. वाचक कट्ट्याचे सूत्रसंचालन राजन मयेकर यांनी केले.

Web Title: Memories of the 'Letter of Notes' in Thane's readers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.