धारावी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर, ८४ लाख येणार खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 05:15 AM2019-03-31T05:15:16+5:302019-03-31T05:15:42+5:30

पुरातत्त्व विभागाची मंजुरी : ८४ लाख येणार खर्च

Fund sanctioned for repair of Dharavi fort, 84 lakh will be spent | धारावी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर, ८४ लाख येणार खर्च

धारावी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर, ८४ लाख येणार खर्च

Next

मीरा रोड / भाईंदर : भाईंदरच्या चौक परिसरातील ऐतिहासिक पण दुर्लक्षित अशा धारावी किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीसाठी पुरातत्त्व विभागाने ८४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. किल्ल्याचे काम लवकरच सुरू केले जाईल, असे विभागाने युवा प्रतिष्ठान संस्थेचे गणेश बामणे यांना लेखी कळवले आहे. त्यामुळे धारावी किल्ल्याची दुरवस्था संपेल, अशी आशा दुर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे.

ऐतिहासिक वारसा असलेला व संरक्षित स्मारक असूनही धारावी किल्ल्याकडे सरकारच्या पुरातत्त्व विभागासह महापालिका, लोकप्रतिनिधी, पोलीस आदींनी सातत्याने दुर्लक्ष चालवले होते. त्यामुळे किल्ला असुरक्षित होऊन मद्यपी, व्यसनींचा अड्डा बनला. झुडुपे वाढून बांधकामाचे नुकसान केले गेले. किल्ल्याची दुरवस्था रोखण्यासह त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी युवा प्रतिष्ठानसह दुर्गप्रेमींनी श्रमदान करून किल्ल्याची साफसफाई चालवली आहे. किल्ल्याची डागडुजी व सुरक्षा करण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने सरकारकडे व सतत पाठपुरावा चालवला होता. अखेर, पुरातत्त्व विभागाने धारावी किल्ला हा संरक्षित स्मारक असल्याचे स्पष्ट केले आहे. किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ८४ लाखांची मंजुरी मिळालेली असून किल्ल्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी गणेश बामणे यांना कळवले आहे.
नरवीर चिमाजी अप्पा यांच्या वसई मोहिमेच्यावेळी ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी चार हजार सैनिक व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला होता. पण, पोर्तुगीजांनी २८ नोव्हेंबर १७३८ ला धारावीला धडक मारून तो पुन्हा ताब्यात घेतला.
६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला, अशी इतिहासात नोंद आहे.

सलग १४ महिने स्वच्छता मोहीम
युवा प्रतिष्ठान या संस्थेने सलग १४ महिन्यांपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी धारावी किल्ल्यावर संवर्धन आणि स्वच्छता मोहीम राबवली असल्याचे बामणे म्हणाले.
 

Web Title: Fund sanctioned for repair of Dharavi fort, 84 lakh will be spent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.