नेतृत्वाकडून भ्रमनिरास झाल्याने पृथ्वीवरील स्वर्गात पेटला वणवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 12:06 AM2018-12-06T00:06:02+5:302018-12-06T06:42:36+5:30

पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या फ्रान्समधील पॅरिस शहरात गेले तीन आठवडे राडेबाजी सुरू आहे.

In France, the campaign of agitation, leadership, and illusion | नेतृत्वाकडून भ्रमनिरास झाल्याने पृथ्वीवरील स्वर्गात पेटला वणवा

नेतृत्वाकडून भ्रमनिरास झाल्याने पृथ्वीवरील स्वर्गात पेटला वणवा

Next

- अश्विनी भाटवडेकर 
ठाणे : पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या फ्रान्समधील पॅरिस शहरात गेले तीन आठवडे राडेबाजी सुरू आहे. इंधनदरवाढ आणि सोशल सिक्युरिटी चार्जेसमध्ये जानेवारी महिन्यापासून होणारी अपेक्षित वाढ यामुळे तेथील लोकांच्या संयमाचा बांध फुटला. ‘यलो व्हेस्ट’ या नावाने सुरू झालेल्या या आंदोलनात सर्वसामान्य जनतेबरोबरच ‘ब्लॅक ब्लॉक्स’च्या लोकांनी सहभाग घेऊन आंदोलनाला हिंसक वळण दिले. रस्त्यावर वाहने जळत होती, तर ठिकठिकाणी मॉल, दुकाने यांच्या काचा फोडल्या जात होत्या.
भारतात काही दिवसांपूर्वी इंधनाच्या दरात महिना ते पंधरा दिवस सतत वाढ होत होती. मात्र, त्याबद्दल कुणी ब्र काढला नाही. तेथे सोशल सिक्युरिटी चार्जेसमुळे लोकांची माथी भडकली. अगदी अलीकडेच राज्य सरकारने वेगवेगळ्या विकास कामांकरिता मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ केली. विजेचे दर दरवर्षी वाढत असून वर्षभरात दुप्पट रकमेची बिले येत आहेत. फ्रान्स हा पुढारलेला, शिक्षणाचे प्रमाण अधिक असलेला देश असूनही तेथे लोकांनी हिंसेचा आधार घेतला. मात्र, आपल्याकडे लोकांमधील सोशिकता वाखाणण्याजोगी आहे.
पॅरिसमध्ये तब्बल १८ वर्षे वास्तव्य केलेल्या आणि मूळच्या मुंबईकर असलेल्या शलाका मोदी सांगतात की, फ्रान्समधल्या लोकांना मोर्चे काढायला किंवा रस्त्यावर उतरायला फार आवडतं. काहीही झालं की, फ्रेंच लोक रस्त्यावर आलीच. पण, यावेळचे आंदोलन वेगळे होते.
राष्टÑाध्यक्ष मॅक्रॉन यांनी सत्तेवर आल्यावर अनेक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. या सर्व सुधारणा प्रामुख्याने आर्थिक आहेत. (भारतात नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी व जीएसटी लागू करून आर्थिक सुधारणांचा प्रयत्न केला व त्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे, हा योगायोग आहे) याच सुधारणांचा एक भाग म्हणून सोशल सिक्युरिटी चार्जेसमध्ये वाढ करण्यात आली. सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष खदखदत आहे. फ्रान्समध्ये दर तासाला ठरावीक पगार देण्याची पद्धत आहे. या बेसिक सॅलरीमध्ये लोकांच्या अनेक गरजा भागत नाहीत. याचा राग लोकांच्या मनात होताच. त्यातच २०१९ च्या जानेवारीपासून पुन्हा कर वाढत असल्याचे सरकारकडून जाहीर झाल्यावर मात्र, लोकांचा संयम संपला आणि ते रस्त्यावर उतरले. सुरुवातीला फेसबुकवरून ही मोहीम सुरू झाली आणि बघताबघता त्याला खूप व्यापक स्वरूप प्राप्त झाले. जागोजागी लोकांचे जत्थेच्या जत्थे रस्त्यावर उतरले. या संपूर्ण चळवळीला ‘यलो व्हेस्ट’ असं म्हटलं गेलं. फ्रान्समध्ये गाडी चालवताना यलो जॅकेट घालणं अनिवार्य आहे. हे सगळं आंदोलनही इंधनाशी संबंधित असल्याने मग त्याला हे नाव दिलं गेलं, असं शलाका सांगतात. मुळात सरकारला डिझेलवरील गाड्या कमी करायच्या असल्याने हे कर लादले जात आहेत.
१७ नोव्हेंबरला या आंदोलनाची सुरुवात झाली. फ्रान्स बंद करणार असल्याचं आंदोलकांनी आधीच जाहीर केले होते. परंतु, त्या दिवशी फार काही झालं नाही. केवळ लोक रस्त्यावर उतरले. पण, त्यानंतरच्या शनिवारी झालेल्या आंदोलनात मात्र १० हजार लोक सहभागी होते. हाही दिवस तसा शांततेत पार पडला. पण, त्यानंतर या आंदोलनात ‘ब्लॅक ब्लॉक्स’च्या लोकांनी सहभाग घेतला. मग मात्र, आंदोलन हिंसक झालं, चिघळलं. या लोकांनी ‘आर्क द ट्रायम्फ’ या ऐतिहासिक स्मारकाच्या येथे जाऊनही आंदोलन केले. दुसऱ्या महायुद्धातील ज्या सैनिकांची लोकांना फारशी माहिती नाही, त्यांचे हे स्मारक. वाईट म्हणजे, या स्मारकाच्या आत असलेल्या अनेक पुतळ्यांची आंदोलकांनी तोडफोड केली. येथे असलेल्या ज्योतीलादेखील धक्का पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण आंदोलकांपैकीच काही जणांनी तो हाणून पाडला. (मुंबईत रझा अकादमीच्या आंदोलनात काही युवकांनी आझाद मैदान येथील स्मारकाची काही वर्षांपूर्वी तोडफोड केली होती. त्याची आठवण या घटनेमुळे झाली.)
शलाका म्हणाल्या की, इथे आंदोलनं खूप होतात. आताचं आंदोलनही खूप मोठं आहे. पण, आम्ही प्रोटेस्ट करणार आहोत किंवा मोर्चा काढणार आहोत, असं आधीच जाहीर केलेलं असल्याने सामान्य लोकांना त्याचा फार फटका बसत नाही. मोर्चा, आंदोलन असेल तर लोकही बाहेर पडत नाहीत. या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं.
गेली १० ते १५ वर्षे पेट्रोल, डिझेलच्या दरांत सातत्याने वाढ होतेच आहे. पर्यायाने कर वाढत आहे. तुलनेने पगार मात्र कमी असल्याचे विनीता थत्ते-डार्निस सांगतात. त्या गेली ३५ वर्षे फ्रान्सच्या उपनगरात वास्तव्य करत आहेत. सुरुवातीचे दोन शनिवार हे आंदोलन शांततेत पार पडले. त्यानंतर हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली. परंतु, लोक ऐकायला तयार नव्हते. एक आई मुलीला घेऊन रुग्णालयात जात होती. पण, आंदोलनकर्त्यांनी रस्ते बंद केले होते. यामुळे बिथरलेल्या त्या आईने गाडी बेफाम रेटली आणि त्यात एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला.
पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी येणारे टँकर आंदोलकांनी रस्त्यातच अडवले. आंदोलनाच्या काळात अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. जाळपोळ पाहून पर्यटक हॉटेलच्या बाहेर पडलेच नाही. गेल्या वर्षीपेक्षा २० ते ३० टक्क्यांनी कमी बुकिंग झाल्याचे हॉटेलवाले सांगत असल्याचे विनीता म्हणाल्या. आंदोलन थांबवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्या प्रयत्नांना फार यश येताना दिसत नाही.
खरेतर, राष्टÑाध्यक्ष मॅक्रॉन यांच्याकडून जनतेला खूप आशा होत्या. राजकीय विचारसरणीची पार्श्वभूमी नसल्याने हा नेता न्याय देईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, सत्तेत आल्यापासून गेल्या १८ महिन्यांच्या कालावधीत काहीच सकारात्मक घडलेले नाही. याचाही असंतोष लोकांच्या मनात होताच, त्यालाही यानिमित्ताने वाट मिळाली.
>पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आणि त्यावरील कर याविरोधात तीन आठवड्यांपासून फ्रान्समध्ये सुरू असलेले आंदोलन अनोखे आहे. कारण, कोणत्याही कर्मचारी युनियनचा यात सहभाग नाही. नागरिकच स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी विरोध केला. यावेळी पॅरिसमधील दुकानांमध्ये तोडफोड झाली, लूटमार आणि वाहनांची जाळपोळही झाली.
- शलाका मोदी, पॅरिस
>कनिष्ठ आणि मध्यमवर्गाचे पगारात भागणे कठीण जात असताना जानेवारीपासून नवीन कर लादण्यात येणार असल्याने लोकांचा उद्रेक झाला. सामान्यपणे युनियनच्या नेत्यांच्या भडकावू भाषणाने लोक रस्त्यावर उतरतात. पण, आमच्याकडे इतका असंतोष होता की, लोकांनी नेतृत्वाची वाट पाहिली नाही. कोणताही राजकीय पक्ष यात सहभागी नव्हता.
- विनीता थत्ते (डार्निस), ली चेसने, पॅरिस

Web Title: In France, the campaign of agitation, leadership, and illusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.