भटक्या आणि पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 10:52 PM2018-12-12T22:52:58+5:302018-12-12T22:53:19+5:30

भटक्या कुत्र्यांसह पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेने अखेर पावले उचलली आहेत.

Flock and pet parks for pets | भटक्या आणि पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क

भटक्या आणि पाळीव प्राण्यांसाठी पेट पार्क

Next

ठाणे : भटक्या कुत्र्यांसह पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेने अखेर पावले उचलली आहेत. त्यानुसार घोडबंदर येथील कावेसर भागात ५ हजार चौरस मीटर जागेवर महापालिका पाळीव - भटक्या प्राण्यांकरीता उपचार केंद्र, नसबंदी केंद्र, आधारगृह, स्मशानभूमी असे एकाच छताखाली पेट पार्क विकसित करणार आहे. खाजगी संस्थेच्या माध्यमातून याची देखभाल केली जाणार असून यासाठी स्वारस्य देकार मागविले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे.

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आधीच मार्गदर्शक तत्वे घातली आहेत. त्यानुसार भटक्या प्राण्यांकरीता आधारगृह, कोंडवाडे बांधणे, भटक्या प्राण्यांची नसबंदी करणे, मृत प्राण्यांच्या दहनाकरीता स्मशानभूमीची सोय करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. याच मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत ठाणे महापालिकेने आता पावले उचलली आहेत. सध्या महापालिका हद्दीत ३ हजार चौरस फूट जागेत भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. त्याठिकाणी २ आॅपरेशन थिएटर असून तिथे त्यांच्यावर उपचारही केले जातात. परंतु ही जागा कमी पडत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता पेट पार्क उभारण्याचा प्रस्ताव पालिकेने पुढे आणला आहे.

या प्रस्तावानुसार प्राण्यांची नसबंदी, प्राण्यांवर उपचार, आधारगृहे - कोंडवाडा, शवदहन वाहीनी आणि पेट पार्क विकसित केले जाणार आहे. यासाठी ५ हजार चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडाची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार कावेसार येथील पार्कचे आरक्षण असलेल्या भूखंडावर हे पार्क विकसित केले जाणार आहे. याठिकाणी पार्कचे ११८००.०० चौरस मीटरचे आरक्षण असून त्यातील ५ हजार चौरस मीटर आरक्षणावर हे सुविधा केंद्र विकसित केले जाणार आहे.

Web Title: Flock and pet parks for pets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.