ठाण्यात चॉकलेटच्या बहाण्याने पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 19:34 IST2017-12-17T19:22:34+5:302017-12-17T19:34:22+5:30
घरात खेळण्यासाठी आलेल्या एका पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणा-यास चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

अत्याचार करणा-यास अटक
ठाणे: नामांकित कंपनीचे चॉकलेट देण्याच्या अमिषाने एका पाच वर्षीय मुलीशी लैंगिक चाळे करणा-या जनार्दन कापसे याला चितळसर पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
घोडबंदर रोडवरील एका इमारतीमध्ये ही पिडीत मुलगी आणि आरोपी जनार्दन वास्तव्याला आहेत. त्याच्याकडे खेळण्यासाठी इमारतीमधील बरीच मुले जमा होत होती. मुले खेळायला आल्यानंतर कालांतराने तो इतर मुलांना बाहेर जायला सांगून या मुलीशी लैंगिक चाळे करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. तिला त्रास झाल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. तिने याप्रकरणी १६ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास चितळसर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. १३ डिसेंबर रोजी तसेच त्याआधीही त्याने हा प्रकार केल्याचे तिने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेत पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा तो पसार झाला होता. अखेर शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याला घरातूनच पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे, उपनिरीक्षक एम. डी. कड यांच्या पथकाने अटक केली. पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.