दिवाळीच्या खरेदीचा उत्साह शिगेला, मॉलमधील खरेदीला पसंती, कापडखरेदीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 02:46 AM2018-11-05T02:46:34+5:302018-11-05T02:46:51+5:30

दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा... गरिबातील गरीब व्यक्ती हा सण मोठ्या आवडीने साजरा करते. प्रत्येकाच्या कुवतीनुसार खरेदी केली जाते. कपडे, कंदील, फराळ, पणत्या या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी बाजारपेठ फुलून जाते.

The enthusiasm of the shopping of Diwali, the choice of shopping in the mall, and the clash of clothes | दिवाळीच्या खरेदीचा उत्साह शिगेला, मॉलमधील खरेदीला पसंती, कापडखरेदीला फटका

दिवाळीच्या खरेदीचा उत्साह शिगेला, मॉलमधील खरेदीला पसंती, कापडखरेदीला फटका

Next

- जान्हवी मोर्ये
डोंबिवली - दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा... गरिबातील गरीब व्यक्ती हा सण मोठ्या आवडीने साजरा करते. प्रत्येकाच्या कुवतीनुसार खरेदी केली जाते. कपडे, कंदील, फराळ, पणत्या या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी बाजारपेठ फुलून जाते. या खरेदीचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. खरेदीसाठी ग्राहकांकडून मॉल्सला पसंती दिली जात आहे. हा मॉलखरेदीचा ट्रेण्ड शहरातील दुकानदारांना मारक ठरला आहे. विशेषत: कपडे विक्री करणाऱ्या दुकानदारांना याचा फटका जास्त बसला आहे.
डोंबिवलीतील तयार कपडेविक्रेते प्रकाश सतरा यांनी सांगितले की, सध्या मॉलमध्ये खरेदीचा ट्रेण्ड असल्याने बाजारातील कपडेविक्रेत्यांच्या दुकानाला फटका बसला आहे. यंदाच्या दिवाळीत खरेदीचे प्रमाण ६० टक्के घटले आहे. इतक्या वर्षात एवढी घट कधीच आली नाही. कल्याण, डोंबिवली, ठाणे तसेच मुंबईतील मॉलमध्ये जाऊन लोक दिवाळीची खरेदी करत आहेत. कपडेखरेदीचा कल मॉलकडे झुकला असल्याने आमच्यासारख्या दुकानदारांचे दिवाळीत मरण झाले आहे. त्यात कपडेविक्रीवर १८ टक्के जीएसटी आहे. त्यामुळेही धंद्याला झळ बसली आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आमच्यासाठी निराशाजनक आहे.
अन्य एक कापडविक्रेते अमित होरा म्हणाले खरेदीचे प्रमाण सध्या तरी कमी आहे. सोमवारपासून खरेदीला जोर येईल. कपड्यांमध्ये नवीन पॅटर्न आलेले आहेत. यंदा कपडेविक्रीत भाववाढ नाही. धंदा कमी आहे.

रांगोळी आणि रंगावली
रांगोळीविक्रेते मधुकर काळे यांनी सांगितले की, रांगोळीचा मोठा ग्लास १० रुपये, लहान ग्लास पाच रुपये किमतीला आहे. रंगीत रांगोळीचे एक पाकीट १० रुपये आहे. त्यात विविध रंग आहेत. पूर्वी प्लास्टिकच्या ग्लासमध्ये रांगोळी व रंग एकत्र करून विकले जात होते. प्लास्टिकबंदीमुळे ते आता विकले जात नाहीत. हे रंग ग्लासमध्ये तयार असल्याने वापरणे सोयीचे जात होते. रांगोळीच्या एका गोणीमागे २५ रुपये वाढले. सफेद रंगाच्या गोणीमागे ४० रुपये भाववाढ झाली आहे. तरीदेखील, ग्राहकाला रांगोळी विकताना भाववाढ केलेली नाही. मागच्या वर्षी दिवसाला एक हजार रुपये धंदा व्हायचा. सध्या दिवसाला ५०० रुपयेही धंदा होत नाही.

कंदील आणि पणत्या : छोटे कंदील ६० रुपये डझन, एक नग १० रुपयांना आहे. पणतीस्टॅण्ड १०० रुपयांना असून मेणाची पणती आणि चिनी मातीच्या साध्या पणत्याही आहेत. दोन्ही प्रकारच्या पणत्यांना मागणी आहे. महिला बचत गटाच्या संध्या काळे यांनी सांगितले की, जेल आणि मेणाच्या पणत्या विकल्या जात आहेत. जेल आणि फॅन्सी पणतीची किंमत १०० रुपये आहे. कंदील १०० ते ५०० रुपयांना आणि मणी तोरण २०० ते ६०० रुपयांचे आहे. विक्रेते आनंद पवार यांनी सांगितले की, विजेच्या दिव्यांचे तोरण ८०० रुपयांना असून एक दिवा १५० रुपयांना विकला जात आहे.

इकोफ्रेण्डली कंदील
प्लास्टिक व थर्माकोलबंदीमुळे बाजारात प्लास्टिक व थर्माकोलचे आकाशकंदील नाहीत. त्यामुळे कागदी कंदील व त्यावर सोनेरी किनार असे कंदील बाजारात आहेत. कागदी कंदिलांना बाजारात जास्त मागणी आहे. लोकांचा कल बदलतोय, ही समाधानकारक बाब कंदीलविक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. कागदी कंदील ६०० ते ८०० रुपयांना विकला जात आहे. आइस्क्रीमच्या कांडीपासून आणि वुली पेपरने इकोफ्रेण्डली कंदील तयार करणारे विनायक बुदूर यांनी सांगितले की, इकोफ्रेण्डली कंदिलांना जास्त मागणी आहे. कंदील इकोफ्रेण्डली असले, तरी त्यात भाववाढ नाही. २०० ते ६०० रुपये एका कंदिलाची किंमत आहे.

कुछ मिठा हो जाए...
दुर्गाराम मेढिया यांनी सांगितले की, चॉकलेट खरेदी केले जातात. विशेषत: भेटवस्तू दिली जाते. १०० ते ५५० रुपयांपर्यंत चॉकलेट आहेत. चॉकलेटला जास्त मागणी आहे. सोनपापडी, रसगुल्ला, बदामहलवाही आहे. ड्रायफू्रट लहान आकाराचे पॅकेट २०० रुपये ते ६५० रुपयांचे आहे. काजू, मनुके, खारीक, मावा चेरी हे सुट्या पद्धतीने फराळासाठी घेतले जाते. त्याचे प्रमाण कमी आहे. त्यात एक ते दीड टक्का भाववाढ झालेली आहे.

केरसुणी
लक्ष्मीपूजनासाठी केरसुणी खरेदी केली जाते. तिचे पूजन केले जाते. एरव्ही, फेरी करून केरसुणी विकणाºया लक्ष्मी आरावटे यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांपासून त्या केरसुणी विकतात. बाजारात प्लास्टिक केरसुण्या आहेत. त्यांचा पूजेसाठी वापर केला जात नाही. नारळाच्या झावळ्यांपासून तयार केलेल्या केरसुणीचे पूजन केले जाते. लहान आकाराची केरसुणी जी पूजेसाठी वापरली जाते, तिची किंमत १५ रुपये आहे. यात भाववाढ नाही.

लाह्या, बत्ताशे :लक्ष्मीपूजनासाठी लागणाºया लाह्या व बत्ताशांचे एक पाकीट १० रुपयांना आहे. यंदा माल जास्त विक त घेतला आहे. त्याची विक्री झालेली नाही. त्यामुळे तो अंगावर पडण्याची शक्यता आहे. तीन दिवसांत धंदा झाला तर होईल, अशी माहिती बत्ताशेविक्रेते बसवराज यांनी दिली आहे.

फराळ :सुनील शेवडे यांनी सांगितले की, फराळात चकली, चिवडा, अनारशांना मागणी आहे. सगळ्यात जास्त मागणी बेसन लाडूला आहे. फराळाला आॅर्डर असते. सोमवारपासून फराळविक्री होणार नाही. माल संपलेला असेल. आताच्या पिढीला फराळाचे अप्रूप नाही. जुन्या पिढीला फराळाशिवाय दिवाळी झाल्यासारखे वाटत नाही. फराळ हीच दिवाळीची खरी ओळख आहे.
 

Web Title: The enthusiasm of the shopping of Diwali, the choice of shopping in the mall, and the clash of clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.