महापालिकेच्या शाळा होणार डिजिटल! शिक्षणाचा दर्जा उंचावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:50 PM2018-07-06T23:50:26+5:302018-07-06T23:50:59+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अखत्यारितील विविध माध्यमांच्या ३६ शाळांतील शिक्षणाचे डिजिटलायझेशन करून पटसंख्या व दर्जा वाढवण्यासाठी प्रशासन व सत्ताधारी भाजपा प्रयत्न करत आहे.

 Digital school will be digital! To improve the quality of education | महापालिकेच्या शाळा होणार डिजिटल! शिक्षणाचा दर्जा उंचावणार

महापालिकेच्या शाळा होणार डिजिटल! शिक्षणाचा दर्जा उंचावणार

googlenewsNext

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अखत्यारितील विविध माध्यमांच्या ३६ शाळांतील शिक्षणाचे डिजिटलायझेशन करून पटसंख्या व दर्जा वाढवण्यासाठी प्रशासन व सत्ताधारी भाजपा प्रयत्न करत आहे. हा प्रस्ताव ७ जुलैच्या स्थायी समितीत मान्यतेसाठी आणला जाणार आहे. याची सुरुवात मराठी माध्यमाच्या शाळेपासून केली जाणार आहे.
पालिकेच्या मराठी माध्यमाच्या २१ तर हिंदी, उर्दू व गुजराती माध्यमाच्या प्रत्येकी पाच शाळा सुरू असून त्यात एकूण सात हजार ५०२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळा शहरातील विविध ठिकाणच्या २२ इमारतींत सुरू आहेत. खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांचा दर्जा सुमार असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अशातच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी होऊन त्यांचे पालक खाजगी शाळांना प्राधान्य देतात.
पालिका आपल्या अखत्यारितील शाळांतील पटसंख्या वाढवण्यासाठी दरवर्षी शिक्षकांना प्रशिक्षण शिबिर घेते. पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण सेमी इंग्रजीमध्ये देण्यास गेल्या वर्षीपासून सुरुवात केली. या खेरीज, पालिकेकडून विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्याचे वाटप केले जात असतानाही या शाळांतील सुमार दर्जाच्या शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ लागली आहे. विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी पालिका शाळांतील शिक्षणपद्धती खाजगीच्या तुलनेत अधिक दर्जेदारपणे उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांना डिजिटलपद्धतीच्या माध्यमातून ई-क्लासद्वारे शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील यांच्या निधीचा वापर केला जाणार असून हा ई-क्लास प्रत्येक शाळेच्या इमारतीतील एका वर्गात सुरू केला जाणार असून त्याची सुरुवात मराठी माध्यमाच्या शाळांपासून केली जाणार आहे. या ई-क्लासद्वारे विद्यार्थ्यांना टूडी व थ्रीडी प्रणालीद्वारे शिकवले जाणार असून त्यासाठी अ‍ॅनिमेशन शिक्षणपद्धतीचा वापर केला जाणार आहे. या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करून त्यांना शिक्षण देणे सोयीस्कर ठरत असल्याने शिक्षणाचे ते प्रभावी माध्यम ठरणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण व्हावी, यासाठी त्यांची विविध खेळांद्वारे प्रश्नोत्तरांची चाचणी शिक्षकांकडून घेतली जाणार आहे. हा ई-क्लास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित असल्याने शिक्षकांनादेखील तो हाताळणे सुलभ ठरणार आहे.
ई-क्लासच्या अभ्यासाअंती विद्यार्थ्यांच्या आकलनाची चाचपणी केली जाणार आहे. यामुळे पालकांचा पालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार असल्याने त्यातून पालिका शाळांतील विद्यार्थी पटसंख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.


आॅगस्टमध्ये होणार वर्गाला प्रारंभ
याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, ही प्रणाली भाडेतत्त्वावर सुरू करून ती टप्प्याटप्प्याने सर्व माध्यमांच्या शाळांत सुरू केली जाणार आहे.
खाजगी शाळांमधील ही शिक्षणपद्धती पालिका शाळांत सुरू होणार असल्याने पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गळती रोखणे शक्य होणार आहे. आॅगस्टमध्ये ई-क्लासच्या शिक्षणाला सुरुवात केली जाणार आहे.

Web Title:  Digital school will be digital! To improve the quality of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.