जीएसटीमुळे प्रचार साहित्याची मागणी घटली, यंदा मनसेचं निवडणूक साहित्य पडूनच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 01:31 AM2019-04-05T01:31:18+5:302019-04-05T01:32:28+5:30

व्यावसायिकांचा हिरमोड । युती आणि आघाडी झाल्याने विक्रीवर परिणाम

Demand for promotional literature has reduced due to GST, this time MNS election material is being played | जीएसटीमुळे प्रचार साहित्याची मागणी घटली, यंदा मनसेचं निवडणूक साहित्य पडूनच

जीएसटीमुळे प्रचार साहित्याची मागणी घटली, यंदा मनसेचं निवडणूक साहित्य पडूनच

Next

अजित मांडके 

ठाणे : एकीकडे युती होऊ नये... आघाडी झाली नाही तर बरेच, असे अनेक इच्छुकांना लोकसभा निवडणूक लागण्यापूर्वी वाटत होते; परंतु श्रेष्ठींपुढे त्यांचे काही चालले नाही. युती आणि आघाडीसुद्धा झाल्याने अनेक इच्छुकांचे अवसान गळाले आहे. या इच्छुकांसोबतच निवडणुकीच्या काळात झेंडे, बॅनर, पोस्टर्स आदी प्रचार साहित्य बनवणाऱ्या व्यावसायिकांचासुद्धा हिरमोड झाला. त्यांनी प्रत्येक पक्षासाठी लागणारे निवडणूक साहित्य तयार केले होते; परंतु युती आणि आघाडीचेही सूत जुळल्याने त्यांचा अपेक्षाभंग झाला असून, त्याआधीच तयार केलेल्या साहित्याचे करायचे तरी काय, असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. दुसरीकडे, जीएसटीमुळे प्रचार साहित्यामधील प्रत्येक वस्तू दोन रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत महागली आहे. घटलेली मागणी आणि जीएसटीमुळे वाढलेले भाव, यामुळे प्रचार साहित्याच्या विक्रीमध्ये ४० टक्के घट झाली आहे.

ठाण्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. शिवसेना आणि राष्टÑवादीचे उमेदवार ८ एप्रिलला रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणि त्यानंतर होणाऱ्या सभा, मेळावे, रॅली यासाठी लागणाºया निवडणूक साहित्याची जमवाजमव करण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यात तसे एकही प्रचार साहित्यविक्रीचे स्वतंत्र दुकान लागलेले नाही; परंतु वागळे इस्टेटमधील एका गोडाउनमध्ये सध्या साहित्याची विक्री सुरू आहे. येथे आठ ते दहा कर्मचारी कामाला आहेत. सध्या निवडणूक साहित्याच्या या बाजारात टोप्या, बॅजेस, रबरबॅण्ड, मफलर, कटआउट आदींसह प्लायचे कटाउट हे सध्या ठाण्यात चर्चेचा विषय आहे.
मागील विधानसभा आणि त्यानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत युती तसेच आघाडी झाली नव्हती. त्यामुळे त्याचा फायदा या विक्रेत्यांना झाला होता. त्यांच्या उत्पन्नात बºयापैकी वाढ झाली होती. आतासुद्धा लोकसभा निवडणुकीत हे सर्व पक्ष वेगवेगळे लढतील, असा या विक्रेत्यांचा अंदाज होता. परंतु, तसे काही घडलेच नाही. शिवसेना आणि भाजपाची युती झाली; सोबतच काँग्रेस आणि राष्टÑवादीची आघाडीही झाली. त्यामुळे याचा फटका या विक्रेत्यांना बसला आहे. युती किंवा आघाडी होणार नाही, हे गृहीत धरून त्यांनी आधीपासूनच प्रचार साहित्य तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. युती आणि आघाडी झाल्याने इतर साहित्याचे करायचे काय, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे.



जीएसटीमुळे वाढल्या किमती
जीएसटीचा फटका निवडणूक साहित्यविक्री करणाऱ्यांनासुद्धा बसला आहे. पूर्वी टोपी पाच रुपयांना मिळत होती. आता ती सात रुपये झाली आहे. रबरबॅण्ड पाच, बॅजेस सात रुपये, मफलर १२ ते १५ रुपये, टी-शर्ट ७० रुपये आणि प्लायचे कटआउट १५० ते २०० रुपयांना विकले जात आहे. प्रचारासाठी लागणारे वाहन प्रतिदिन २० हजार रुपये दराने उपलब्ध राहणार आहे. यावेळी उन्हाचा वाढता पारा लक्षात घेऊन, टोप्यांची मागणी वाढली असल्याचे विक्रेते संजय सुतार यांनी सांगितले.

मनसेचे निवडणूक साहित्य पडून
या निवडणुकीत प्रमुख पक्ष म्हणून मनसेकडेसुद्धा पाहिले जात होते. हा पक्ष लोकसभा निवडणूक लढवेल, या अपेक्षेने त्यांचेसुद्धा प्रचार साहित्य तयार करण्यात आले होते. यामध्ये भाजप विरुद्ध हॅण्ड कटाउटची संख्या जास्त होती. परंतु, मनसेने निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेले साहित्य तसेच पडून राहिले आहे.



ताई, माई, अक्काची जागा घेतली अंकल आणि आण्टीने
पूर्वी प्रचारात ताई, माई, अक्का रंगत भरत होत्या. त्या टोपी, बॅजेस, मफलर आदी प्रचार साहित्य आवडीने वापराच्या. आता त्यांची जागा सुशिक्षित अंकल, आण्टी आणि तरुणांनी घेतली आहे. त्यांना अशा प्रकारचे प्रचार साहित्य वापरण्यात फार रस नाही. त्यामुळेही निवडणूक साहित्याच्या विक्रीत घट झाली आहे. एकूणच या सर्वांचा परिणाम होऊन, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा विक्रीमध्ये ४० टक्कयांची घट झाली आहे.
 

Web Title: Demand for promotional literature has reduced due to GST, this time MNS election material is being played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.