काँग्रेसच्या सपारांची निवड वादात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 03:03 AM2017-08-18T03:03:53+5:302017-08-18T03:03:57+5:30

काँग्रेसच्या प्रभाग २२ अ मधील उमेदवार उमा सपार यांच्या बिनविरोध निवडीवर शिवसेनेच्या उमेदवार दक्षा गुप्ता यांनी आक्षेप घेतला आहे.

Controversy in Congress election? | काँग्रेसच्या सपारांची निवड वादात?

काँग्रेसच्या सपारांची निवड वादात?

Next

भार्इंदर : काँग्रेसच्या प्रभाग २२ अ मधील उमेदवार उमा सपार यांच्या बिनविरोध निवडीवर शिवसेनेच्या उमेदवार दक्षा गुप्ता यांनी आक्षेप घेतला आहे. सपार यांनी उमेदवारी अर्जात निरक्षर असल्याचे नमूद केले असून जात प्रमाणपत्रासाठी मात्र शाळेचा दाखला जोडला असल्याचा दावा करत त्यांची बिनविरोध निवड रद्द करण्याची मागणी गुप्ता यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
सपार या इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असून त्यांनी २००२ व २००७ मधील निवडणूक काँग्रेसच्याच तिकिटावर लढवली होती. २००२ मधील निवडणुकीत त्यांनी निरक्षर असल्याचे उमेदवारी अर्जात नमूद केले होते. परंतु, जातप्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्यांनी शाळेचा दाखला जोडल्याचा दावा यंदाच्या निवडणुकीतून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या उमेदवार गुप्ता यांनी केला आहे. यंदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दक्षा यांनी ओबीसी या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभाग २२ अ या जागेसाठी शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दक्षा यांच्याकडे जातपडताळणी प्रमाणपत्र नसल्याने त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात त्यासाठी अर्ज केला होता. परंतु, अर्ज केल्याचा पुरावाही त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केला नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी पुरावा सादर करण्यासाठी अर्ज छाननीपर्यंतची वेळ दिली होती. परंतु, त्या वेळेनंतरही दक्षा यांनी पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला असता तो निवडणूक निर्णय अधिकाºयांनी नियमावर बोट ठेवत नाकारला. परिणामी, दक्षा यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवला गेला. यामुळे सपार यांची बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले. आपला नाहक बळी गेल्याची भावना निर्माण झाल्याने दक्षा यांनी सपार यांच्या बिनविरोध निवडीवरच आक्षेप घेतला आहे. सपार यांच्या जातप्रमाणपत्रावेळी सादर केलेल्या शिक्षणाच्या पुराव्यावरच संशय व्यक्त करत त्याची चौकशीची मागणी केली आहे.
>प्रभाग १०, १२ मध्ये तीन हजार बोगस मतदार
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत प्रभाग १० व १२ मध्ये अनुक्रमे १४०० व १६३६ बोगस मतदारांची नावे मतदारयादीत घुसवण्यात आली, असा आरोप मीरा-भार्इंदर काँग्रेसचे निरीक्षक राजेश शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. यात भाजपाचा हात असल्याचा दावा केला आहे. काँग्रेसने यापूर्वीच भाजपाकडून बोगस मतदारांची नोंद होत असल्याबाबतची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ११ हजार बोगस नावे मतदारयादीतून वगळण्याचे निर्देश निवडणूक प्रशासनाला दिले होते. यानंतरही प्रभाग १० व १२ मध्ये एकूण ३०३६ बोगस मतदारांची नोंद अद्याप मतदारयादीत कायम ठेवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रभागातील काँग्रेस उमेदवारांच्या सर्वेक्षणातून बोगस मतदारांच्या नावांचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बहुतांश बोगस मतदारांचे मतदान केंद्र आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेत असल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. याविरोधात निवडणूक निर्णय अधिकाºयांसह पोलीस व राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, स्थानिक निवडणूक प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासन सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेस पक्ष भाजपाखेरीज इतर सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन या बोगस मतदारांमार्फत मतदान करून घेण्याचा डाव हाणून पाडणार आहे, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला प्रदेश प्रतिनिधी मेहुल व्होरा, माजी महापौर तुळशीदास म्हात्रे, काँग्रेसचे उमेदवार उपस्थित होते.
>काँग्रेसच्या उमा सपार यांनी उमेदवारी अर्जात नमूद केलेली माहिती विसंगत असल्यानेच त्यांच्या चौकशीची मागणी आयोगाकडे केली आहे. त्याला दाद न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार आहे.
- दक्षा गुप्ता, शिवसेना उमेदवार
>काँग्रेसच्या उमा सपार यांनी दोनवेळा निवडणुका लढवल्या असून यंदा त्यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे. तत्पूर्वी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना कोणतीही माहिती लपवलेली नाही.
- अनिल सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

Web Title: Controversy in Congress election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.