श्रमाला प्रतिष्ठा ही संकल्पनाच रुजलेली नाही - मिलिंद रानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 02:37 AM2018-09-22T02:37:00+5:302018-09-22T02:37:05+5:30

श्रमाला प्रतिष्ठा ही संकल्पनाच भारतात नाही. श्रमिक व कष्टकरीवर्गाला कमी व तुच्छ लेखण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

The concept of Sharman Pratishtha is not rooted - Milind Ranade | श्रमाला प्रतिष्ठा ही संकल्पनाच रुजलेली नाही - मिलिंद रानडे

श्रमाला प्रतिष्ठा ही संकल्पनाच रुजलेली नाही - मिलिंद रानडे

Next

- मुरलीधर भवार 
कल्याण : श्रमाला प्रतिष्ठा ही संकल्पनाच भारतात नाही. श्रमिक व कष्टकरीवर्गाला कमी व तुच्छ लेखण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी प्रभावी चळवळ उभारण्याची गरज आहे. सरकारने केलेल्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे, असे मत कचरा वाहतूक श्रमिक संघाचे सरचिटणीस मिलिंद रानडे यांनी २२ सप्टेंबर या श्रमप्रतिष्ठा दिनानिमित्त व्यक्त केले.
रानडे म्हणाले की, ‘आपल्याकडे शारीरिक काबाडकष्टाच्या कामाला काहीच किंमत नाही. मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या जीवाची सुरक्षितता नाही. मॅनहोलमध्ये आकंठ बुडून ते त्यातील घाण काढतात. मात्र, बाहेर आल्यावर अंघोळीसाठी साधी पाण्याचीही व्यवस्था नसते. शिवाय, विविध वायूंमुळे त्यांचा जीव गुदमरून मृत्यू होऊ शकतो. सफाई कामगारांच्या आरोग्याविषयी अनास्था आहे. इतकेच काय तर सुरक्षारक्षकांनाही आठ तासांऐवजी १२ तासांची ड्युटी करावी लागते. साप्ताहिक सुटीही दिली जात नाही. एवढे करूनही त्यांना सात ते आठ हजार इतका तुटपुंजा पगार मिळतो. राज्यात किमान वेतन कायदा लागू आहे. त्यानुसार, किमान १४ हजार रुपये वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र, हा कायदा कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी करणाºयांवर कारवाई होत नाही.’
‘घरातील गृहिणीच्या कष्टाचे मोजमाप होत नाही. याबाबतीत सगळी श्रमाची किंमत पुरुषांच्या खात्यात जमा होते. त्यांचे काम महत्त्वाचे समजले जाते’, असे रानडे म्हणाले. लांब पल्ल्यांची मालवाहतूक करणारे ट्रक, ट्रेलरवरील वाहनचालकांना मदतीला क्लीनर दिला जात नाही. हॉटेलमध्ये भांडी घासणाºयांना अत्यल्प पगार दिला जातो. वीटभट्टीवरील कामगाराला तर वेठबिगार म्हणून राबवून घेतले जाते. गुराढोरासारखे काम करूनही मालक तुच्छ वागणूक देतात. कामाच्या ठिकाणी जीवाची सुरक्षितता पुरवली जात नाही, अशी खंत रानडे यांनी व्यक्त केली. रॅम्पवॉक करताना मॉडेलचा पाय मुरगळला, तर त्याची बातमी होते. मात्र, कष्टकरी महिला कामगारांच्या पायात खिळा घुसून ती जखमी झाली, तर त्याची बातमी होत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असेही ते म्हणाले़
>दलित चळवळ प्रगल्भ होती़़़
उत्तर प्रदेशात इतका जातीयवाद होता की, अनेकांना चळवळ उभी करताना व नेतृत्व करताना आडनावे सोडावी लागली. चंद्रशेखर व जयप्रकाश नारायण यांनी आपली आडनावे लावली नाहीत. आपल्याकडील दलित चळवळ प्रगल्भ होती.
आता तिच्या मागण्या आणि विचार बदललेले आहे. सत्तेच्या जवळ गेल्याने हा बदल झाला आहे. यापूर्वी त्यांच्या मागण्या वेगळ्या होत्या. हे देखील तितकेच खरे आहे. त्यांच्या चळवळीचे ध्येय आणि उद्दिष्ट हे प्रतिष्ठा मिळवण्यासाठीचेच होते. त्यात श्रमाचा मुद्दाही महत्त्वाचा होता, असे रानडे यांनी सांगितले.

Web Title: The concept of Sharman Pratishtha is not rooted - Milind Ranade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.