लग्नाचे अमिष दाखवून लूट करणा-यास अटक, दागिन्यांसह एक लाखाचा ऐवज हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 19:57 IST2017-11-20T19:57:17+5:302017-11-20T19:57:26+5:30
आपण अविवाहित असल्याची बतावणी करुन एका ३८ वर्षीय विधवेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याकडून ८६ हजारांच्या दागिन्यांसह एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत सीताराम पवार (२९, रा. भांडूप) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे.

लग्नाचे अमिष दाखवून लूट करणा-यास अटक, दागिन्यांसह एक लाखाचा ऐवज हस्तगत
ठाणे : आपण अविवाहित असल्याची बतावणी करुन एका ३८ वर्षीय विधवेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याकडून ८६ हजारांच्या दागिन्यांसह एक लाख दोन हजारांचा ऐवज लुबाडणा-या सुशांत सीताराम पवार (२९, रा. भांडूप) याला वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून फसवणूकीतील सर्व ऐवज हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुशांत भांडूपच्या सर्वोदयनगर भागात वास्तव्याला असून तो विवाहित आहे. त्याची पत्नी चार महिन्यांची गरोदर आहे. मात्र, त्याने ही सर्व माहिती दडवून ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावरुन वाडा (जिल्हा पालघर) येथील महिलेची माहिती काढली. तिच्या बहिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याने तिच्याशी जवळीक साधली. नंतर तिला लग्नाचे अमिष दाखविले. मार्च २०१८ मध्ये आपण लग्न करू, असेही तो तिला म्हणाला. मध्यंतरीच्या काळात आई आजारी असल्याचे कारण दाखवून त्याने दागिने विकण्यास तिला भाग पाडले. त्यासाठी ठाण्याच्या रामचंद्रनगर येथील ‘सागर ज्वेलर्स’ या दुकानात तिला नेले. तिथे तिच्या शीतपेयात गुंगीचे औषध टाकून तिच्याकडील १६ ग्रॅम ५०० मिली ग्रॅम वजनाची सोनसाखळी तसेच इतर दागिने आणि १६ हजारांची रोकड असा एक लाख दोन हजार १०० रुपयांचा ऐवज तिच्या पर्समधून काढून त्याने ३० आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ६ ते १०.३० वाजण्याच्या सुमारास पलायन केले. याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी तिने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. निरीक्षक अनघा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्या पथकाने त्याला सोमवारी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याकडून रोकड आणि दागिने असा एक लाख दोन हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.