पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडले, ठाणेकर ‘काेंडी’त अडकले; काम लांबल्याने PWD चे अधिकारी मोबाइल बंद करून बसले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 09:05 AM2024-04-18T09:05:18+5:302024-04-18T09:05:28+5:30

१६ एप्रिल रोजी रात्री ११ ते १७ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत माजीवडा उड्डाणपुलावरील हा मार्ग बंद ठेवला होता.

Bridge repair work stalled, Thanekar stuck in traffic As the work got delayed, the PWD officials switched off their mobile phones | पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडले, ठाणेकर ‘काेंडी’त अडकले; काम लांबल्याने PWD चे अधिकारी मोबाइल बंद करून बसले

पुलाच्या दुरुस्तीचे काम रखडले, ठाणेकर ‘काेंडी’त अडकले; काम लांबल्याने PWD चे अधिकारी मोबाइल बंद करून बसले

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : माजीवडा उड्डाणपुलावरील एक्सपान्शन  जॉइंट्समधील तुटलेली पट्टी बदलण्याचे काम तब्बल आठ तास लांबल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे बुधवारी ठाणेकरांना सहा ते सात तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. बुधवारी पहाटे ५ वाजता पूर्ण हाेणारे काम दुपारी १ वाजता पूर्ण न झाल्यामुळे शेकडो वाहने कोंडीत अडकली. 

नियम धाब्यावर बसवून वाहने उलटसुलट चालवणारे वाहनचालक आणि काम लांबल्यामुळे मोबाइल बंद करून बसलेले पीडब्ल्यूडीचे अधिकारी यांनी लोकांच्या मनस्तापात व संतापात भर घातली. घाेडबंदर ते ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तसेच कापूरबावडी ते पातलीपाडा आणि मुंबई-नाशिक महामार्गावर ढोकाळी-हायलँड रोडवर वाहनांच्या माेठ्या रांगा लागल्या हाेत्या.

घोडबंदर ठाणे मार्गावरील माजीवडा ओव्हरब्रिजवरील एक्सपान्शन जॉइंट्समधील तुटलेली पट्टी बदलण्याचे काम १६ एप्रिल रात्रीपासून ते १७ एप्रिल रोजी पहाटे पाचपर्यंत करण्यात येणार होते. त्यासाठी घोडबंदरकडून माजीवडा उड्डाणपुलावरून मुंबई जेएनपीटीकडे तसेच नाशिककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रॉडवे पेट्रोल पंपासमोरील ब्रिज चढणीजवळ प्रवेश बंद केला होता. त्याऐवजी या वाहनांना पेट्रोल पंपासमोरील स्लीप रोडने पुढे सरळ जाऊन  कापूरबावडी सर्कलमार्गे जाण्यासाठीची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक शाखेने १३ एप्रिल रोजी काढली होती. 

१६ एप्रिल रोजी रात्री ११ ते १७ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत माजीवडा उड्डाणपुलावरील हा मार्ग बंद ठेवला होता. तांत्रिक अडचणींमुळे हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम सकाळी ११:३० वाजता अंशत: पूर्ण केले. सिमेंट सुकण्यासाठी आणखी दीड तास म्हणजे दुपारी १ वाजेपर्यंत हा पूल बंद ठेवावा लागला. त्यानंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. सकाळी ७ ते दुपारी १ या सहा तासांत या मार्गावर अवजड वाहनांसह अन्य वाहनांची काेंडी झाली. चालकांनी चुकीच्या पद्धतीने वाहने दामटल्याने कोंडीत भर पडली. 

कापूरबावडी चौकात पूर्व द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल उभारला आहे. उड्डाणपुलावरील रस्त्याच्या दोन भागांमध्ये बसविलेली लोखंडी पट्टी बदलण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. बुधवारी रामनवमीनिमित्त सुटी असल्याने वाहनांची वर्दळ कमी असावी, असा अंदाज बांधून वाहतूक पोलिसांनी बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत कामाची परवानगी दिली होती. परंतु, कामाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे सकाळ झाली तरी काम सुरूच होते. 

काेंडी फाेडण्यासाठी भर उन्हात वाहतूक पाेलिसांची कसरत सुरू हाेती. कामाला विलंब झाल्याने पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचे फाेन या काळात नाॅट रिचेबल असल्याने काम कधी पूर्ण होणार याची कुठलीच माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली नाही. 

Web Title: Bridge repair work stalled, Thanekar stuck in traffic As the work got delayed, the PWD officials switched off their mobile phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.