भाजप-मनसेचे सोशल मीडियावर वॉर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 12:20 AM2019-10-18T00:20:28+5:302019-10-18T00:21:49+5:30

उमेदवाराचे शिक्षण, लोडशेडिंगचे मुद्दे चर्चेत : चौकसभा, रॅलींवर भर

BJP-MNS war on social media | भाजप-मनसेचे सोशल मीडियावर वॉर

भाजप-मनसेचे सोशल मीडियावर वॉर

Next

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे मंदार हळबे व काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांच्यात तिरंगी लढत होत आहे. डोंबिवलीतील प्रचार रस्त्यापेक्षा सोशल मीडियावर अधिक जोमाने सुरू आहे. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपासून लोडशेडिंगपर्यंत अनेक मुद्द्यांवरील आरोप-प्रत्यारोपांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कळस गाठला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे चव्हाण यांच्याकडे कोकणपट्ट्यातील ३९ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे दौरे सुरू आहेत, त्यामुळे ते मतदारसंघामध्ये फारसा वेळ देत नसले तरी भाजप, शिवसेनेचे सर्व नगरसेवक कामाला लागले असून गल्लोगल्ली प्रचार सुरू आहे. त्यातच, पश्चिमेला नगरसेवक विकास म्हात्रे, राजन सामंत, पूर्वेला राहुल दामले, मुकुंद पेडणेकर हे निवडणूक प्रभारी म्हणून काम बघत आहेत.


चौकसभा, रॅली यावर सर्वच पक्षांनी जोर दिला आहे. मनसेच्या उमेदवारासाठी पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर, राजन गावंड हे प्रचाराला आले होते. तसेच पश्चिमेकडील पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी हे सकाळपासून जनसंपर्कावर भर देत आहेत. हळबेंसोबत शहराध्यक्ष राजेश कदम हे रॅलीत सहभागी होत आहेत. तसेच हळबे हे ठिकठिकाणी सोसायटी मीटिंगवर भर देत आहेत. सकाळच्या वेळेत पुसाळकर उद्यानासह क्रीडासंकुल, जिमखाना अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊन ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठितांच्या भेटी घेत आहेत. तसेच जनसामान्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.


काँग्रेसकडून आतापर्यंत कोणतीही सभा झालेली नाही. परंतु, प्रदेशपातळीवरून चारुलता टोकस, बी.एन. संदीप असे नेते या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी कार्यकर्ते, नगरसेवकांशी संवाद साधला. भाजपने प्रचारासाठी कोणतेही मोठे नेते अद्याप या ठिकाणी बोलावले नसले, तरी राज्यमंत्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेपर्यंत बैठका, सकाळच्या वेळेत कामाचे वाटप आणि प्रत्यक्ष प्रचार असे काम सुरू आहे.


शहरात काहीच झाले नाही, ही मनसेची टीका खोडून काढण्यासाठी भाजपने हिंदुत्ववादी विचारांचे व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना मैदानात उतरवले असून त्यांच्या आतापर्यंत २० हून अधिक चौकसभा झालेल्या आहेत. मनसेने भाजपच्या राज्यमंत्र्यांनी गेल्या १० वर्षांत मतदारसंघाचा विकास केलेला नाही, हे मतदारांवर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये माणकोली प्रकल्प कसा अर्धवट असून राज्यमंत्र्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात तो पूर्ण झाल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर विकासाच्या मुद्द्यावरून भाजप, मनसेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.


मनसेचा आरोप भाजपने काढला खोडून
आमदार रवींद्र चव्हाण यांनी शहर लोडशेडिंगमुक्त केले नाही, अशी टीका मनसेने केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्वप्रथम डोंबिवली हे शहर चव्हाण यांनी लोडशेडिंगमुक्त कसे केले, याचे व्हिडीओ भाजपने प्रसृत केले. मनसे उमेदवाराचा आपण उच्चशिक्षित असल्याचा मुद्दादेखील भाजपने खोडून काढला. त्यावर मनसे उमेदवाराने मी उच्चशिक्षित नव्हे सुशिक्षित असल्याचे म्हटले.
रा.स्व. संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपासून स्वयंसेवकांपर्यंत सगळेच मतदारांच्या व मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिक संघ, युवावर्ग, महिला मंडळ तसेच सर्वधर्मीयांच्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अन्य निवडणुकांसारख्या जेवणावळी यावेळी दिसल्या नाही. अन्य पक्षांसह अपक्ष उमेदवारही त्यांच्या परीने प्रचार करीत आहेत.

Web Title: BJP-MNS war on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.