भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले - राजन खान यांचे प्रतिपादन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 06:21 AM2017-09-11T06:21:43+5:302017-09-11T06:22:01+5:30

कोणत्याही साहित्य प्रकाराची लाट फार तर २२ वर्षे चालते. मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याची लाट असल्याचे मानले जात होते. तिला २२ वर्षे झाली. त्यामुळे त्यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले आहे, असे खळबळजनक प्रतिपादन ज्येष्ठ सर्जनशील लेखक राजन खान यांनी रविवारी येथे केले.

 Bhalchandra Nemede fills the days of the waves - Rajan Khan's rendition | भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले - राजन खान यांचे प्रतिपादन  

भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले - राजन खान यांचे प्रतिपादन  

Next

कल्याण : कोणत्याही साहित्य प्रकाराची लाट फार तर २२ वर्षे चालते. मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याची लाट असल्याचे मानले जात होते. तिला २२ वर्षे झाली. त्यामुळे त्यांच्या साहित्य लाटेचे दिवस भरले आहे, असे खळबळजनक प्रतिपादन ज्येष्ठ सर्जनशील लेखक राजन खान यांनी रविवारी येथे केले.
सार्वजनिक वाचनालय आणि अक्षरमानव यांच्या लेखन कार्यशाळेत ते बोलत होते. तुम्ही इतरांचा द्वेष करता तीही हिंसाच आहे. एखादी व्यक्ती दुसºया जातीची आहे, असे समजता तेव्हा तुम्ही हिंसाच करीत असता. संकुचित पिढीने लिहिलेले साहित्यही संकोचानेच येते. असे साहित्य काळाच्या कसोटीवर टिकणे शक्य नाही. चांगले लिहिण्यासाठी मेंदूने उदात्त होणे आणि माणूस होणे गरजेचे आहे. सगळ््या भाषा आपल्याच असतात. तसा प्रत्येक भाषेतील लेखकही आपला असतो. हा उदात्त हेतू ज्यांच्या साहित्यात होता, ते लेखकच टिकले. हिंसक लोक येतात व जातात. पण माणूस म्हणून जगण्याची सवय लावा, असा सल्ला त्यांनी कार्यशाळेत दिला.
कथा, कादंबरी, कविता यात मूलत: एक कथाच असते. गोष्ट हा जगण्याचा मूलभूत पाया आहे. आपल्याला लेखक व्हायचे आहे. हा विचार डोक्यातून काढून टाका. लेखकाला जर तंत्रशैली सुचली नाही, तरी प्रथमत: जे सुचते ते कागदावर उतरवा. चांगला लेखक होण्यासाठी एका जागेवर ठिय्या मांडून बसण्याची ताकद हवी, असा सल्ला खान यांनी नवोदितांना दिला.
कविता शिकवता येत नाही. ती अंगी असावी लागते. कवितेची कार्यशाळा गर्भसंस्कारासारखी असते. तसे संस्कार कवितेवर झाल्यास ती अधिक सशक्त आणि सदृढ बनते, असे नारायण लाळे यांनी सुचवले. सोशल मीडियावरील प्रतिक्रियांचे निकष कवितेला लावू नका आणि गटातटांच्या राजकारणाला बळी पडू नका. त्यात नवोदित कवी भरकटत जातील आणि त्यांची कविता मरण पावेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कविता चांगली की वाईट ही शोधता आली पाहिजे. प्रसिध्दीच्या मागे लागला नाहीत, तरी चांगली कविता प्रसिद्धी मिळवतेच. कविता हे लेखनव्रत आहे. ती जगणे म्हणजे जखम आणि जोखीम आहे. कवितेत वेगळेपणा महत्त्वाचा. ज्येष्ठांचे, अन्य साहित्यिकांचे वाचले नाही, तर कविता समृद्ध कशी होणार, असा सल्ला राजीव जोशी यांनी दिला.
कथा बाळबोध, पाल्हाळीक नसावी. त्यात तपशील हवा पण साद्यंत घटनाक्रमाचा अट्टहास नको, यावर सुबोध जावडेकर यांनी भर दिला. तपशील जास्त असले, तर कथा सीमित होते. त्यात वाचक सहभागी होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे त्या दृष्टीने कथा लिहिण्याचा सल्ला त्यांनी दिला. कादंबरी ज्या विषयावर लिहायची असेल त्या चौकटीत स्वत:ला बसावा; तरच अनुभव मांडता येतील. मानवी जीवनाचे सखोल चित्रण कादंबरीत व्हावे, अशी अपेक्षा डॉ. महेश केळुस्कर यांनी व्यक्त केली.

या कार्यशाळेला कोल्हापूर, नाशिक, पुणे, धुळे, मुंबई अशा विविध भागातून साधारण १०० च्या आसपास नवोदित लेखकांनी हजेरी लावली. दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर ही कार्यशाळा भरवल्याचे सांगत तिचा नवोदितांना फायदा होईल, असे वाचनालयाचे पदाधिकारी भिकू बारस्कर यांनी सांगितले.

Web Title:  Bhalchandra Nemede fills the days of the waves - Rajan Khan's rendition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.