अबब! जागा २३८ उमेदवार मात्र ४९०३२, ओळख पटण्याकरिता बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 03:31 AM2018-03-15T03:31:46+5:302018-03-15T03:31:46+5:30

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील रिक्त शिपाईपदाच्या २३८ जागांसाठी सुरू असलेल्या पोलीसभरतीसाठी विविध राज्यांतील ४९ हजार ३२ इच्छुकांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येत आहे.

Aub! The seats of 238 candidates are only 4,932, the use of biometric system for identification | अबब! जागा २३८ उमेदवार मात्र ४९०३२, ओळख पटण्याकरिता बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर

अबब! जागा २३८ उमेदवार मात्र ४९०३२, ओळख पटण्याकरिता बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर

Next

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील रिक्त शिपाईपदाच्या २३८ जागांसाठी सुरू असलेल्या पोलीसभरतीसाठी विविध राज्यांतील ४९ हजार ३२ इच्छुकांची शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. तसेच दररोज दोन हजार ५०० इच्छुकांना भरती प्रक्रियेसाठी बोलवण्यात येत असून ४९ हजार ३२ इच्छुकांमध्ये नऊ हजार ५६६ इच्छुक पदवीधर, चार हजार ७७७ इच्छुक हे पदव्युत्तर पदवीधर व इतर आहे. तसेच उर्वरित ३४ हजार ६८९ इच्छुक हे एचएससी झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे. तसेच भरतीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून उमेदवारांची ओळख पटण्याकरिता बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर केला आहे. त्याचबरोबर भरतीदरम्यान उन्हाळ्याचा उमेदवारांना त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक तेवढी काळजी घेतल्याची माहिती ठाणे शहर पोलीस अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे शहर पोलीस साकेत मैदानात पोलीसभरती प्रक्रिया पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे होण्याच्या दृष्टिकोनातूून सुरुवात झाली आहे. शहरात उन्हाचा पारा चढताना दिसत असल्याने उमेदवारांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये, याकरिता पहाटे ५ ते ११ आणि त्यानंतर दुपारी ३.३० ते ६.३० या वेळेत दररोज दोन हजार ५०० उमेदवारांना शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येते. मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेले गुण
त्यांना तत्काळ वाचून दाखवले जात आहेत. त्यानंतर, त्यांची स्वाक्षरी घेण्यात येते. ज्या उमेदवारांनी
आपल्या शारीरिक मोजमापासंदर्भात आक्षेप घेऊन संधीची मागणी केली आहे. त्याला तीन वेळा संधी दिली जात आहे.
>आमिषाला बळी पडू नये
भरती प्रक्रियेकरिता पैशांची मागणी कोणी करत असेल, तर सहआयुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्तांशी तथा ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी थेट संपर्क साधावा, तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रानडे यांनी केले आहे. तर, भरती प्रक्रियेतील सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच उमेदवारांनादेखील मैदानावर असताना मोबाइलचा अनावश्यक वापर करण्यास बंदी घातली आहे. तसेच भरती बंदोबस्ताकरिता आणि प्रक्रियेतील नेमलेल्या पोलीस अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या रंगांची ओळखपत्रे दिली आहेत.
अशी घेतली आहे काळजी
डमी उमेदवार सहभागी होऊ नये, यासाठी मैदान चारही बाजूने बंदिस्त केले आहे. ओळख पटण्यासाठी बायोमेट्रिक सिस्टीमचा वापर, सीसीटीव्ही कॅ मेरे लावले असून प्रत्येक चाचणीचे व्हिडीओ शूटिंग होत आहे. मैदानावर पुरेशा पाण्याची फवारणी होते. इजा झाल्यास तातडीने प्रथमोपचार साहित्य, वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पथक तैनात केले आहे. तसेच मैदानावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष आहे.
चाचणीसाठी व्यवस्था
मैदानी चाचण्या करताना उमेदवारांना त्रास होऊ नये, यासाठी १०० मीटर धावणे चाचणीसाठी तीन मैदाने, लांबउडी व गोळाफेक चाचणीसाठी चार मैदाने, पुलअप्ससाठी तीन स्टॅण्ड्स, १६०० मीटर धावणे चाचणीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडांची सावली असणारा रस्ता उपलब्ध करून त्या ठिकाणी घेण्यात येत आहे.

Web Title: Aub! The seats of 238 candidates are only 4,932, the use of biometric system for identification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस