पार्किंगचा प्लॉट अंबरनाथ पालिकेने गमावला, नगरसेवक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 01:17 AM2019-06-23T01:17:13+5:302019-06-23T01:17:25+5:30

अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील पालिकेच्या पार्किंगची जागा वकिलाच्या चुकीमुळे गमावण्याची वेळ आली आहे.

Ambernath Municipal Corporation lost parking park, corporator angry | पार्किंगचा प्लॉट अंबरनाथ पालिकेने गमावला, नगरसेवक संतप्त

पार्किंगचा प्लॉट अंबरनाथ पालिकेने गमावला, नगरसेवक संतप्त

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरील पालिकेच्या पार्किंगची जागा वकिलाच्या चुकीमुळे गमावण्याची वेळ आली आहे. पार्किंगच्या प्लॉटवर त्रयस्थ व्यक्तीने दावा केल्याने तो प्लॉट संबंधित व्यक्तीकडे वर्ग केला आहे. हे करत असताना पालिकेच्या वकिलाने या प्लॉटची पालिकेला गरज नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने तो प्लॉट हातातून गेल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात नगररचना विभागाने प्लान मंजूर करण्याची कोणतीही घाई करू नये, अशी ओरड सभागृहात करण्यात आली.

अंबरनाथ नगरपालिका कार्यालयासमोरच पार्किंगचा प्लॉट होता. त्यावर अतिक्रमण असल्याने तत्कालीन मुख्याधिकारी राजेश कानडे यांनी कारवाई करत हा प्लॉट मोकळा केला होता. मात्र, हा प्लॉट मोकळा करण्यामागे वेगळेच कारण होते, हे समोर आले आहे. एकीकडे प्लॉट मोकळा झालेला असताना त्याचा ताबा हा त्रयस्थ व्यक्तीला देण्यात आला होता. त्याला तो प्लॉट मोकळा करणे शक्य नसल्याने पालिकेला हाताशी धरून तो
रमोकळा करण्यात आला. प्लॉट मोकळा होताच त्या ठिकाणी एका खाजगी व्यक्तीने दावा करत हा प्लॉट मिळवला. अर्थात, त्यासंदर्भातील सर्व कायदपत्रे नियमानुसारही तयार करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना काही अटी व शर्तींवर तो प्लॉट दिलाही.

वरवर हे प्रकरण साधे वाटत असले, तरी त्यामध्ये प्रशासनाचे अधिकारी आणि पालिकेची बाजू मांडणारे वकीलही सहभागी असल्याचे शुक्रवारी सभागृहात उघड झाले. हा प्लॉट देताना पालिकेच्या वकिलांनी थेट या प्लॉटची पालिकेला गरज नाही, असे न्यायालयात स्पष्ट केले. वकिलाचे म्हणजे पालिकेचे म्हणणे असल्याने न्यायालयानेही संबंधित व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला आहे. निकाल लागल्यानंतर यासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी त्याची कल्पना पालिकेला देणे गरजेचे होते. मात्र, संबंधित वकिलांनी निकाल लागल्यानंतर तब्बल वर्षभरानंतर त्याची माहिती पालिकेला दिली.
ज्या वकिलांची नेमणूक पालिकेची बाजू मांडण्यासाठी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पालिकेच्या विरोधातच काम केल्याचा आरोप नगरसेवकांनी सभागृहात केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्लॉटवरील आलेला प्रस्ताव थांबवण्याची मागणी करण्यात आली. नगररचना विभागाने या जागेवरील आलेल्या प्रस्तावाबाबत निर्णय घेताना सभागृहाची परवानगी घ्यावी, अशी मागणी यावेळी नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी केली.

रुग्णवाहिका नसल्याने नगरसेवकाचा संताप

अंबरनाथ नगरपालिकेच्या छाया रुग्णालयाचे हस्तांतरण सरकारकडे करताना पालिकेच्या रुग्णवाहिका आणि शववाहिनी सरकारकडे वर्ग करण्यात आल्या. त्यामुळे आता पालिकेच्या ताब्यात एकही रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांना मुंबईला नेताना त्रास सहन करावा लागत आहे.
पालिकेने ही सेवा पुरवण्याची गरज असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक उमर इंजिनीअर यांनी केला. आपली मागणी मान्य होत नाही, तोवर सभागृहातील खुर्चीवर न बसता जमिनीवर बसण्याचा निर्णय घेतला.
अखेर, यासंदर्भात इतर नगरसेवकांनीही इंजिनीअर यांची साथ दिल्यावर निविदा मागवत नवीन रुग्णवाहिका आणि शववाहिनी मागवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ही निविदा प्रक्रिया तत्काळ राबवण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले.

रस्त्याच्या विषयावर काँग्रेसचा सभात्याग
अंबरनाथ येथील विम्कोनाका ते गावदेवी रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झालेले असतानाही या रस्त्याची रुंदी वाढवण्याचा विषय घेण्यात आला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही असा ठराव केला जात असल्याने काँग्रेसचे नगरसेवक विलास जोशी यांनी या विषयाला विरोध करत सभात्याग केला.

तोडलेले स्वच्छतागृह धुतल्याचे बिल
अंबरनाथ नगरपालिकेच्या चिंचपाडा भागात एक स्वच्छतागृह तोेडण्यात आलेले असतानाही तेच स्वच्छतागृह नियमित धुण्यात येत असल्याचे दाखवत पालिकेने संबंधित कंत्राटदाराला बिल दिल्याचा आरोप नगरसेविका वृषाली पाटील यांनी केला आहे. तसेच स्वच्छतागृह धुण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा विषय असताना काम मागण्यासाठी गेलेल्या महिला बचत गटांकडून ३० हजारांची लाच मागण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

Web Title: Ambernath Municipal Corporation lost parking park, corporator angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे