ठाण्यात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बंद; चोरांना मोकळे रान; आयुक्तांच्या पाहणीतच गंभीर बाब उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:03 PM2024-03-30T17:03:07+5:302024-03-30T17:04:39+5:30

ठाणे शहराच्या विविध ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत.

about 300 cctv cameras off in thane free range for thieves a serious matter was revealed in the commissioner inspection | ठाण्यात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बंद; चोरांना मोकळे रान; आयुक्तांच्या पाहणीतच गंभीर बाब उघड

ठाण्यात ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बंद; चोरांना मोकळे रान; आयुक्तांच्या पाहणीतच गंभीर बाब उघड

ठाणे :ठाणे शहराच्या विविध ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हे नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यात आता पुन्हा शहरातील तब्बल ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शहरात एकूण १,४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यातील ३०० कॅमेरे बंद असल्याची बाब नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी नियंत्रण कक्षाची पाहणी केली असता समोर आली. कामकाज नेमके कसे चालते, याविषयी आयुक्त राव यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. पालिकेच्या माध्यमातून ठाणे, कळवा आणि मुंब्रा भागात सुरक्षेच्या दृष्टीने १,४००  सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

१) या कॅमेऱ्यांमध्ये चित्रीत होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जाते. त्याचा फायदा शहरातील विविध गुन्ह्यांच्या तपास कामामध्ये पोलिसांना उपयोग झाला. त्यांना गुन्हेगारांचा माग काढून त्यांना पकडणे शक्य झाले आहे. 

२) याशिवाय, नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शहराच्या विविध भागांत आणखी ४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय प्रशासनाने नुकताच घेतला आहे. असे असतानाच, शहरात यापूर्वी बसवण्यात आलेल्या १४०० पैकी ३०० सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आली आहे. 

३) आयुक्त राव यांनी पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, त्याचबरोबर त्यांनी हाजुरी येथील नियंत्रण कक्षाची पाहणी करून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शहरातील ३०० कॅमेरे बंद असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. 

शिवाय, मुंब्रा येथील एकाच भागात कॅमेरे सुरू असल्याचे निदर्शनास आले. कॅमेऱ्याला जोडण्यात आलेल्या तारा तुटल्या असून, त्या जोडणीचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून यावेळी त्यांना देण्यात आली. तसेच नियंत्रण कक्षाचे कामकाज नेमके कसे चालते. 

नागरिकांकडून आलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे कशा पाठविल्या जातात आणि त्यावर कशाप्रकारे कार्यवाही होते, असे अनेक प्रश्न आयुक्तांनी तेथील कर्मचाऱ्यांना विचारले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांना याची उत्तरे देता आली नाहीत. यावरून नाराजी व्यक्त करत आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.  

नागरिकांच्या तक्रारींची वाट पाहू नका-

१) स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तयार केलेल्या अद्ययावत नियंत्रण कक्षाचा वापर वाढवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा अलर्ट त्यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन केंद्राला जलद मिळावा, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. 

२) तसेच नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होण्याची वाट पाहण्याऐवजी नियंत्रण कक्षातील कॅमेऱ्याद्वारेच माहिती घेऊन त्या तक्रारींचे निराकरण करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

Web Title: about 300 cctv cameras off in thane free range for thieves a serious matter was revealed in the commissioner inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.