15 lakhs loss to Thane transport service during the blockade of Thane | ठाण्यात बंदच्या काळात ठाणे परिवहन सेवेचे १५ लाखांचे नुकसान

ठळक मुद्देपरिवहनच्या जुन्या बसेसचा विमाच नाहीनव्या बसेसचा विमा प्रस्ताव अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत

ठाणे -भीमा कोरगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शहरातही उत्सफूर्तपणे बंद पाळण्यात आला. परंतु काही ठिकाणी या बंदला हिसंक वळण लागल्याने त्यामध्ये दोन दिवसात ठाणे परिवहन सेवेच्या ११ बसेसचे नुकसान झाले आहे. त्यातही परिवहन प्रशासनाने अद्यापही बसेसचा विमा न काढल्याने हा खर्च प्रशासनालाच उचलावा लागणार आहे. तसेच बुधवारी बंदच्या काळात परिवहन सेवेचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली.
                  भीमा कोरगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी ठाण्यातही सकाळपासूनच बंद कºयांनी रस्त्यावर उतरुन रास्ता रोको केले. परंतु यातही सकाळी ठाणे परिवहन सेवेमार्फत २५६ बसेस रस्त्यावर सोडण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजेपर्यंत ही सेवा सुरळीत सुरु होती. परंतु काही बसेसच्या काचा फोडण्यात आल्याने परिवहनने ११ वाजता बसेस सोडण्यास बंद केले. परंतु या काळात परिवहनच्या ६ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या असून, यामध्ये दोन बसेसचे खुप नुकसान झाल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली. मंगळवारी सांयकाळी देखील परिवहनच्या पाच बसेसला टारगेट करण्यात आले होते. दोन दिवसात परिवहनच्या ११ बसेसच्या काचा फोडण्यात आल्या असून यामध्ये परिवहनच्या जुन्याच बसेसचा समावेश आहे.
दरम्यान, या बसेसचे झालेले नुकसान परिवहनलाच सोसावे लागणार आहे. एका काचेसाठी पाच हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार हा खर्च लाखांच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु परिवहनने अद्यापही बसेसचा विमाच काढलेला नसल्याची माहिती या निमित्ताने समोर आली आहे. मागील कित्येक वेळेला अशा प्रकारे आंदोलने असोत किंवा इतर काही घटना असोत अशा वेळी परिवहनच्या बसेस टारगेट केल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे असतांना देखील परिवहनच्या बसेसचा अद्यापही विमा काढण्यात आलेला नाही. दुसरीकडे नव्याने घेण्यात आलेल्या बसेसचा विमा काढण्याचा प्रस्ताव मंजुर जरी झाला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र अद्यापही झालेली नाही.
बुधवारी झालेल्या बंदच्या काळात परिवहनच्या बसेस सकाळी ११ वाजल्यापासून बंद करण्यात आल्या होत्या. सांयकाळी सहा नंतर बसेसची सेवा हळू हळू पूर्वपदावर आणण्यात आली. परंतु तो पर्यंत परिवहनचे १५ लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचे परिवहन प्रशासनाने स्पष्ट केले आहे.